अरबी समुद्रात डिझेल तस्करांवर कारवाई

तस्करांसह 5 टन बेहिशेबी डिझेल जप्त

। उरण । वार्ताहर ।

अरबी समुद्रात अवैध डिझेलची तस्करी वाढत आहे. उरण, अलिबागच्या समुद्र हद्दीत अवैध डिझेल तस्करी जोमात सुरु आहे. या अवैध डिझेल टोळीविरोधात भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे. गरूवारी (दि.16) तटरक्षक दलाने ‘जय मल्हार’ नावाच्या मासेमारी जहाजातून काही अमली पदार्थांसह एकूण 25 हजार लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे. या टोळीमध्ये एक प्रमुख म्होरक्या उरण तालुक्यातील माजी नगरसेवक असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. मात्र राजकीय वरदहस्तामुळे हा म्होरक्या अद्यापही कारवाईपासून दूर असल्याचे समजते.

तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, या कारवाईत 5 तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई बंदरात नेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या 25 हजार लिटर डिझेलची किंमत सुमारे 27 लाख रुपये आहे. पकडलेल्या तस्करांनी चौकशीत मोठा खुलासा केला असून त्यांनी सुमारे 5 हजार लिटर डिझेल समुद्रात मासेमारी करणार्‍या बोटींना विकल्याचे काबुल केले आहे. या यशस्वी मोहिमेमुळे समुद्रातील डिझेल तस्करी रोखण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे.

ही तस्करी गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम सुरू आहे. याबाबत अनेकवेळा स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. तसेच, याबाबतचे वृत्त अनेकवेळा प्रसिद्ध होऊनही प्रशासकीय अधिकारी आर्थिक हितसंबंधांमुळे कारवाई करण्यास चालढकलपणा करीत असल्याचे दिसते. याला वेळीच आळा घातला नाही तर मोठा घातपात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version