| उरण | वार्ताहर |
उरण परिसरातील समुद्रकिनारी डिझेल व तेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे. शासकीय यंत्रणेकडून कारवाई होताना दिसत नाही. तरी, या माफियांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जेएनपीटी बंदरात येणार्या परदेशी जहाजांतील कर्मचार्यांशी संधान बांधून समुद्रकिनार्यापासून दूर काही नॉटिकल मैल अंतरावर उभ्या राहणार्या जहाजातील डिझेल छोट्या बोटीत उतरवून खाडी मार्गाने तस्करी करण्याचे काम मागील काही वर्षांपासून जोरात सुरु असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच मोरा व करंजा बंदरातही डिझेल तस्करी सुरु असल्याची चर्चा आहे.
पोलीस, तटरक्षक दल यांना या तस्करीची माहिती असून, त्यांच्या आशीर्वादानेच व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत, असा स्थानिकांचा आरोप आहे. परदेशी जहाजातून जवळपास 30 रुपये लीटरने मिळणारे हे डिझेल बाजारपेठेत जादा दराने विक्री करून महसूल बुडवण्याचे काम हे तस्कर करतात, असे म्हटले जाते.
सध्या डिझेलच्या वाढत्या किमती पाहता, काळ्या बाजारातून गाडी व्यावसायिक डिझेल घेताना दिसत आहेत. दरम्यान, पोलीस ठाण्यांचे सागरी मार्गाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अवैध धंद्यांना ऊत आल्याची चर्चा आहे. कारण, सर्रास खाडीच्या परिसरात डिझेलची तस्करी सुरू आहे. गेल्या 15 दिवसांत याचा ओघ वाढल्याचे दिसत आहे. हे समुद्र चाचे बाहेरून येणार्या बार्जेसच्या चालकांकडून हजारो लीटर डिझेल घेत असतात आणि हे डिझेल साठवून ठेवतात. डिझेलच्या किमती वाढल्याने मोठ्या प्रमाणात या डिझेलला मागणी आहे. उरण, पनवेल, वडखळ, नागोठणे या भागातील ट्रान्सपोर्टचा धंदा करणारे या समुद्र चाच्यांशी संपर्क करून, डिझेल खरेदी करत असतात.