उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला सवाल
। मुंबई । प्रतिनिधी ।
निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना आणून मतासाठी दीड हजारांची मदत दिली. आता त्यातील पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले जात आहे. जर या लाडक्या बहिणींनी विजय मिळवून दिला असेल, तर आता त्यांना फसवून घेतलेली मते परत घेणार का, असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरकारच्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या धोरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका झाल्यावर लाडक्या बहिणींना धक्का देण्यात आला. पाच लाख बहिणींना अपात्र ठरवले जात आहे. तसेच, आता कुठे गेले तीन-तीन भाऊ? देवाभाऊ, जॅकेटभाऊ, दाढीभाऊ, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, लाडक्या बहिणी हुशार आहेत, त्यांना कोण फसवा आहे आणि कोण खरा आहे, हे कळते. तसेच, तरी या लाडक्या बहिणींनी जर यांना मतदान केले असेल तर त्यांना फसवून घेतलेली मतेसुद्धा परत करणार का, असा सवाल करत आता या बहिणींनीच याला वाचा फोडायला हवी, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले आहे.