| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
प्राणी, पक्षी आणि पर्यावरणाची आवड असलेल्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याचे आकर्षण वाढवण्याच्या दृष्टीने मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. याकरिता 54 लाख 17 हजार रुपये खर्च करण्यात येणार असून, यातून अभयारण्यात येणार्या लहान मुलांसाठी नवीन खेळाची उपकरणे, पर्यटकांसाठी अतिरिक्त आसन व्यवस्था, विविध आकारमानाच्या प्राण्यांचे पुतळे तसेच फिटनेस प्रेमी नागरिकांसाठी खुली व्यायामशाळा उभरण्यात आली असून, अभयारण्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर असलेले कर्नाळा पक्षीअभयारण्या विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि वृक्षांचे नंदनवन आहे. अभयारण्य परिसरात असलेला ऐतिहासिक कर्नाळा किल्लादेखील पर्यटकांना आकर्षित करत असल्याने पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या स्थळी नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते. जवळपास 1 हजार 200 हेक्टरमध्ये पसरलेले हे अभयारण्य निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण असल्याने दरवर्षी या ठिकाणी किरकोळ सुधारणा केल्या जातात. मात्र, यावर्षीचा निधी सुधारित पायाभूत सुविधांसाठी सुरक्षित करण्यात आला असल्यामुळे डिसेंबर 2024 पासून कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांनी दिली. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभयारण्याच्या स्वच्छतेच्या दृष्टीने सुविधा वाढविण्यासाठी नवीन डस्टबीन आणि शौचालयाची सुविधादेखील तयार करण्यात आल्या आहे.
मागील वर्षी 75 हजार पर्यटकांनी दिली भेट
कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, मागील वर्षी 75 हजारांहून अधिक पर्यटकांनी अभयारण्याला भेट दिली. नव्या सोयी-सुविधांमुळे यात आणखी भर पडेल, अशी अपेक्षा वन विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.