ठाण्यात साडेतीनशे वाहने जप्त
। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाण्यात थर्टी फर्स्टचे दारू पिऊन सेलिब्रेशन करणे तरुणाईला चांगलेच महागात पडले आहे. वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईमुळे मद्यपी वाहनचालकांची 377 वाहने जप्त करण्यात आली असून त्यांना न्यायालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मद्यपान करून वाहन चालवणे कायद्याने बंदी असून याबाबतचे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी नाकाबंदीत पकडून त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. तर, महिन्याभरात 1 हजार 326 जणांवर ड्रॅन्क अँड ड्राईव्हची कारवाई झाली आहे.
थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यपान करणार्यांची संख्या प्रचंड वाढते. अशा तळीरामांकडून वाहन चालवताना अपघात होऊ नये याकरिता वाहतूक विभागाकडून जनजागृती करण्यात येते. ठाणे वाहतूक विभागाने देखील या प्रकारची जनजागृती करून एक डिसेंबरपासूनच ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई वेगाने सुरू केली होती. त्यामध्ये वाहतूक पोलिसांना तब्बल 1 हजार 326 मद्यपी आढळून आले. या सर्वांवर न्यायालयाच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई झाली आहे. तर, वाहतूक विभागाकडून त्याच दिवशी तळीराम चालवत असलेली वाहने जप्त करण्यात आली.
या कारवाईचा वेग 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या कालावधीत जास्त प्रेमाणात वाढवण्यात आला होता. या सात दिवसांत वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवताना 654 जणांना ताब्यात घेतले, तर दारू पिणार्याच्या मागे बसणार्या 93 जणांना देखील कारवाईला सामोरे जावे लागले आहे. वाहतूक विभागाने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली. ड्रंक अँड ड्राईव्हची सर्वाधिक सर्वाधिक कारवाई 31 डिसेंबरच्या रात्री झाली. या एका दिवसात वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालक आणि वाहन चालकाच्या मागे दारू पिऊन बसणार्या अशा एकूण 377 जणांवर कारवाई करण्यात आल आहे.
31 डिसेंबर रोजी झालेली कारवाई
ठाणे नगर- 17, नौपाडा- 15, कळवा- 16, मुंब्रा- 26, कोपरी- 6, वागळे- 20, कापूरबावडी- 18, कासारवडवली- 27, भिवंडी- 14, नारपोली- 43, कोनगाव- 31, कल्याण- 27, डोंबिवली- 19, कोळसेवाडी- 27, विठ्ठलवाडी- 18, उल्हासनगर- 24, अंबरनाथ- 29.
ड्रंक अँड ड्राईव्ह नियमांची अंमलबजावणी व्हावी याकरिता 17 विभागात 45 ठिकाणी नाकाबंदीचे पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये 377 मद्यपींवर कारवाई केली. त्यांची वाहने जप्त करून पुढील कारवाईसाठी त्यांना दुसर्या दिवशी न्यायालयात पाठवण्यात आले. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे.
– पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक शाखा







