| उरण | प्रतिनिधी |
प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बेकायदेशीर डेब्रिजमूळे उरणमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. नवी मुंबई तसेच मुंबईमधील डेब्रिज, घाण, कचरा उरणमध्ये टाकण्यात येत असल्यामुळे उरणच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी अनेक डंपर चालकांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु, पुन्हा अशाच घटना घडू लागल्या आहेत. चिर्ले भागातील हॉटेल गंगा रसोई या हॉटेलसमोरील रस्त्याच्या कडेला दि.23 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास माती आणि रॅबिट असलेले डेब्रिज टाकण्यासाठी काही डंपर आले होते. याबाबतची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सिडकोच्या पथकाने उरण पोलिसांच्या मदतीने 7 डंपर जप्त करून धीरज सरोज, विमलेशकुमार मदन, राजदेव लोधीया, जगदीश त्रिपाठी, मोहम्मद अकील हुसेन सय्यद, जियारहमान हाझीम अन्सारी आणि मोहम्मद यासीन नबी रहेम खान या डंपरचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रिज टाकत असताना नागरिकांना कोणी आढळल्यास त्यांनी त्वरित सिडकोच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.
डेब्रिज टाकणाऱ्या डंपरवर कारवाई
