एलईडी मासेमारीविरोधात कारवाई

मत्स्य विभागाचा मांडवा बंदरात छापा; 30 एलईडी दिवे, जनरेटर आणि नौकेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

बंदी असतानाही समुद्रात एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नौकेवर रायगडच्या मत्स्य विभागाने धडक कारवाई केली. मांडवा बंदर परिसरात शनिवारी (दि. 31) पहाटे साडेचारच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 30 एलईडी दिवे, जनरेटर आणि मासेमारीची नौका असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महालक्ष्मी प्रसन्न असे या नौकेचे नाव असून, मुंबईतील वर्सोवा येथील केशव कोळी यांच्या मालकीची ती आहे.

मत्स्य विभागाचे पथक रात्रीच्या वेळी मांडवा परिसरातील समुद्रात गस्त घालत असताना अंधाराचा फायदा घेऊन एलईडी दिवे आणि जनरेटरच्या सहाय्याने मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य व्यवसाय अधिकारी महेश खरात आणि त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत संशयित नौका थांबवून तपासणी केली. यावेळी 30 एलईडी दिवे आणि एक जनरेटर आढळून आला. हे साहित्य जप्त करून मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले, तर नौका ताब्यात घेऊन मांडवा बंदरात ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारित अधिनियम 2021 अन्वये संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

कठोर कारवाईचा इशारा
रायगड जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी, एलईडी दिव्यांचा वापर आणि मत्स्यसंपत्तीचे नुकसान करणाऱ्या प्रकारांवर मत्स्यव्यवसाय विभागाची नियमित गस्त सुरू आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांत सहभागी नौकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागाने दिला आहे.
Exit mobile version