| पाताळगंगा | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ भागात विनाकारण वाहने थांबवून प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष मोहिम राबवत पोलिसांनी एका दिवसात तब्बल 30 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मिसिंग लिंक या केबल स्टॅन्ड पुलावर पर्यटक आणि वाहनचालक या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी, मोबाईलवर फोटो काढण्यासाठी किंवा इतर कारणांनी रस्त्याच्या कडेला वाहन थांबवतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वेगवान वाहनांना अचानक अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी विशेष पथके तैनात करत कारवाई मोहीम हाती घेतली. यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नियमांचे काटेकोर पालन करावे, अनधिकृत ठिकाणी वाहन थांबवू नये आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. भविष्यातही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.






