| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठ्यातील सेक्टर 21 व 22, खांदा कॉलनी तसेच उपविभाग नावडे हद्दीतील तळोजे फेज 2 येथील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच, त्यांचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.
पनवेलचे महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनूसार उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘क’ कामोठ्यातील सेक्टर 21,22 व खांदा कॉलनी येथील अनधिकृत झोपड्या, रस्ते तसेच फुटपाथवरील बेकायदेशीर शेड, हातगाड्या, भाजीवाले, फेरीवाले, अनधिकृत नर्सरी यांच्यावरती अधिक्षक दशरथ भंडारी यांच्या देखरेखीखाली अतिक्रमण विभागाच्यासाह्याने ही कारवाई केली. याचबरोबर उपविभाग नावडे हद्दीतील तळोजे फेज 2 येथील बेकायदेशीर झोपड्या, रस्ते तसेच फुटपाथवरील बेकायदेशीर चिकन विक्री शेड, फेरीवाले यांच्यावर अरविंद पाटील यांच्या देखरेखीखाली तोडक कारवाई करण्यात आली. तसेच, नवीन पनवेलमध्ये गुरुवारी रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल्स, दुकानांवरती अतिक्रमण विभागाच्या साह्याने तोडक कारवाई करण्यात आली. याचबरोबर आज प्रभाग समिती ‘ड’ मधील पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत विक्रेत्यांवर व झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर व प्रभारी अधिक्षक रोशन माळी उपस्थित होते.







