रोहा पोलिसांकडून 14 लाखांचा दंड वसूल
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा शहरात वाहतुकीचे नियम भंग होत असल्याने काही प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर जालीम उपचार म्हणून वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या बेशिस्त वाहन चालक मालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करुन अद्याप 14 लाख 22 हजार 500 रुपये दंड वसूल करुन कारवाईचा हिसका दिला आहे.
सोमवार (दि. 8 ) पासून नवीन नियमानुसार वाहन उभे करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. यापुढे सम-विषम पद्धतीने दुचाकी वाहने उभे करण्यात येतील. या नियमाचे पालन करावे, असे माहितीवजा आवाहन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले आहे. नवीन वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या वाहन चालक मालकांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिला आहे.
रोहा बाजारपेठ, एस टी स्टँड, राम मारुती चौक, पोलीस चौकी, दमखाडी नाका, सागर डेअरी परिसर अशा गजबजलेल्या परिसरात वाहन चालकांनी बेशिस्त पद्धतीने आपली वाहने उभी केल्याने इतर वाहनांच्या वाहतुकीस आडथळा निर्माण होत आहे. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करुन वाहतुकीचे नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.







