नामफलकावरुन रिक्षा संघटना आक्रमक
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील रिक्षा चालक मालक संघटना असे नाव असलेला फलक नेरळ मधील एका तरुणाने कापून त्या फलकाचे नुकसान केले होते. त्याचवेळी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनाचे पूर्वसंध्येला तो फलक कापल्याने नेरळ टॅक्सी स्टँड परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि कारवाई केल्याने तणाव कमी झाला होता. दरम्यान, त्या ठिकाणी नवीन फलक लावण्यात आला असून पोलीस आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी संयम दाखवल्याने हुतात्म्यांचा अवमान प्रकरण शांत झाले.
रेल्वे स्टेशन परिसरात भडवळ गावाकडे जाणार्या रिक्षांची थांबा आहे. किमान 25वर्षे तेथे रिक्षा प्रवासी वाहतूक करीत असतात. तेथील रिक्षा चालक यांनी तालुक्यातील हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या नावाने रिक्षा संघटना अलिबाग येथील धर्मादाय अधिकारी कार्यालयात नोंदणीकृत करून घेतली आहे. तेथे तसा फलक लावण्यात आला असून येथील रिक्षा चालक हे दरवर्षी एक जानेवारी रोजी श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करीत असतात. नेरळ स्टेशन येथील स्टँड मध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने पूजेचा कार्यक्रम भडवल येथे आयोजित केला जातो.
एक जानेवारी रोजी सर्व रिक्षाचालक गावी पूजेच्या कार्यक्रमात व्यस्त असताना नेरळ स्टँड येथील फलक बाबू बबन मरे या तरुणाने नासधूस करीत कापून टाकला आणि त्या ठिकाणी स्वतःचा नवीन फिटनेस जिमचा नवीन फलक लावून ठेवला. त्यात दोन जानेवारी रोजी हुतात्मा हिराजी पाटील यांचे बलिदान झाले होते आणि त्या घटनेचा स्मृतिदिन रायगड आणि ठाणे जिल्ह्यात साजरा करण्यासाठी सर्वत्र तयारी केली जात असताना बाबू मरे यांनी तो हुतात्म्यांचा फोटो असलेला फलक कापून टाकल्याने नेरळ मध्ये तरुणांमध्ये संताप निर्माण झाला.ही माहिती पूजेच्या कार्यक्रमात व्यस्त असलेल्या रिक्षा चालक यांना समजताच दोनशे हून अधिक तरुण रिक्षा स्टँड येथे पोहचले. त्यामुळे एक जानेवारीच्या रात्री नेरळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली.
शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत रात्रीच बाबू बबन मरे या तरुणावर केलेली तक्रार नोंदवून घेतली. मात्र स्थानिक रिक्षा चालक आक्रमक झाल्याने शेवटी पोलिसांनी त्या तरुणाला आणून नेरळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. दोन जानेवारी रोजी हुतात्म्यांचा अभिवादन कार्यक्रम साजरा होत असताना हुतात्मा हिराजी पाटील रिक्षा चालक मालक संघटनेकडून फलक तोडून फेकून देण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी रिक्षा व्यवसाय बंद ठेवला. त्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मनीष माळी आणि त्यांचे सहकारी यांना नवीन फलक तयार करा आपण नवीन फलक लावू आणि संबंधित कृत्याबद्दल पोलिसांची कारवाई कठोर असेल असे आश्वासन दिल्याने वातावरण मधील तणाव काहीसा कमी झाला होता. सायंकाळी नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच उषा पारधी यांनी नामफलक अनावरण केले.
यावेळी उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्या श्रद्धा कराळे तसेच दामत ग्रुप ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटमुक्ती मोहीम अध्यक्ष महेश जामघरे तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी भालचंद्र डूकरे,उमेश मिनमिणे आदींसह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य रोहन पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, नवीन नामफलक उभारण्यात आल्याने प्रशासनाकडून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.