तळोजातील अवैध कत्तलखान्यावर कारवाई

90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
। पनवेल । प्रतिनिधी ।
देशात गोवंश हत्या करण्यावर बंदी असतानाही तळोजा कब्रस्तानच्या मागे असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसानी धडक कारवाई करीत 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये खारघर ओवे येथील एक जणाला रंगेहात ताब्यात घेतले, तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. याबाबत तळोजा पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
तळोजा येथील कब्रस्तानाच्या पाठीमागील बाजूस गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल केली जात होती. याबाबतची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील होलार, पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी शुक्रवार दिनांक 01 एप्रिल रोजी आपल्या पथकासह घटनास्थळी छापा मारला असता येथे प्रतिबंधित असलेल्या गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करताना आरोपी मिळून आले.
यातील आरोपी यांनी मांस विक्री करण्याच्या हेतूने सदर कृत्य करीत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी तब्बल 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये गोवंश जातीचे प्राणी गाय आणि बैल, तसेच लोखंडी तराजू आणि कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामानाचा समावेश आहे. याबाबत तळोजा पोलिसांनी खारघर येथील ओवे गावातील इम्रान अब्दुल अजीज पटेल यास अटक केली असून तळोजातील अन्य एक आरोपी फरार आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version