रास्त धान्य दुकानावर कारवाई

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील खोपटे येथील शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणात अनियमितता केल्याप्रकरणी ओमसाई महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाने उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत या दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.

खोपटे येथील ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा अंतर्गत कार्यरत असलेल्या ओमसाई महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत तहसीलदार उद्धव कदम यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.28) महसूल विभागाच्या पथकाने दुकानाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. प्रत्यक्ष स्थळ भेटीदरम्यान असे निदर्शनास आले की, या दुकानातून शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य दिले जात नव्हते, धान्य वितरणात अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले, परवानाधारकाने शासन नियमांचे उघड उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गंभीर बाबी लक्षात घेता, या बचत गटाचा रास्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, असा रीतसर प्रस्ताव जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, खोपटे गावातील नागरिकांची व शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी या दुकानातील शिधापत्रिका तात्पुरत्या स्वरूपात नजीकच्या दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानाला जोडण्यात आल्या आहेत.

Exit mobile version