अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्या पाच डंपरवर कारवाई

सहा जणांवर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील सिडको अधिसूचित क्षेत्रात बेकायदेशीरपणे व लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने डेब्रिज टाकणाऱ्यांविरुद्ध सिडकोच्या भरारी पथक आणि उरण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी 11 ऑगस्ट रोजी उरण पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 5 डंपर जप्त करण्यात आले आहेत.

11 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास, गव्हाण फाटा-चिरनेर रोडवरील दिघोडा जांभुळपाडा (डीएनए मरीन सर्व्हिसेसजवळ) मुख्य रस्त्याच्या बाजूला लोकांच्या आरोग्यास धोकादायक ठरेल अशा प्रकारे बेकायदेशीरपणे डेब्रिज खाली करताना दोन डंपर रंगेहाथ पकडले गेले. याप्रकरणी सिडको द्रोणागिरी नोडल कार्यालयाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता उमेश प्रकाश देशमुख (36) यांच्या तक्रारीवरून अज्ञात डंपर चालक व मालकांविरुद्ध उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुऱ्हाडे पुढील तपास करत आहेत.

वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सिडको पथकाने जांभुळपाडा ज्ञानेश्वर यार्ड परिसरात छापा टाकला. तेथे सिडकोच्या जागेत अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्या चालक मुकेश कुमार तिवारी (37) रा. गोपाळगंज, बिहार, चालक गिरीजा शंकर यादव (51) रा. जौनपूर, उत्तर प्रदेश आणि चालक शिवलाल दाशो तुरी (28) रा. बोकारो, झारखंड या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या चालकांनी सिडको क्षेत्राचे विद्रुपीकरण करून नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास हानी पोहोचेल अशा बेजबाबदार पद्धतीने डेब्रिज टाकल्याने सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता दर्शन दिनानाथ कोळी (38) यांनी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही डंपर जासई पोलीस चौकीत जमा केले असून, पोलीस उपनिरीक्षक रोशन काथारा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version