पोलिसांची कडक नियमावली जारी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईसह राज्यभरात येत्या 13 मार्च आणि 14 मार्च या दोन्हीही दिवशी होळी आणि धुलिवंदन साजरा केला जाणरा आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. हे आदेश 12 मार्च 2025 ते 18 मार्च 2025 पर्यंत असणार आहेत. रमजानचा महिना लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून नुकतंचे एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. यात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. यानुसार, अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे, हावभाव किंवा नक्कलचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावते, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे, रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे यावर प्रतिबंध असणार आहे. तसेच, होळी व रंगपंमीनिमित्त जबरदस्ती वर्गणी मागण्यार्यांवरही कारवाई होणार आहे.
तसेच, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये 1 हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षादेखील होऊ शकते.