वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर कारवाई

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल वाहतूक शाखेने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या तसेच विना हेल्मेट दुचाकी चालविणार्‍या, सीट बेल्ट न लावणार्‍या वाहन चालकांविरोधात जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. पनवेल वाहतूक शाखेने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल येथील कोळखे गांव येथील ब्लॅक स्पॉटवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 53 वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 23 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला.

यावेळी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळा, कारावई टाळा असा संदेश देखील वाहन चालकांना दिला. तसेच पनवेल शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी देखील कोळखे गांव येथील रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांनी वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

Exit mobile version