सायंकाळी उद्यानांमध्ये वाढली वर्दळ

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले असून, त्यातून थोडासा दिलासा मिळवण्यासाठी सायंकाळी उद्यानांकडे नागरिकांचा ओढा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. पनवेल शहरातील विविध उद्यानांमध्ये संध्याकाळच्या सुमारास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी उद्यान हा नागरिकांचा आवडता पर्याय ठरत आहे.

दिवसभर कडक उन्हामुळे घराबाहेर पडणे टाळणारे अनेक नागरिक सायंकाळी वातावरणात गारवा जाणवताच उद्यानात फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. लहान मुले मैदानात खेळताना, महिलावर्ग गवतावर बसून गप्पा मारताना तर ज्येष्ठ नागरिक निवांत बसून थंड हवेत वेळ घालवताना दिसत आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत उद्यान परिसरात उत्साही आणि आनंददायी वातावरण निर्माण होत आहे. काही नागरिक नियमित चालणे, व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी उद्यानात येत आहेत. तरुण वर्गही मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्यासाठी उद्यानांची निवड करत असल्याने सायंकाळच्या वेळेत उद्यानांमध्ये विशेष चैतन्य दिसून येत आहे. वाढत्या उकाड्यामुळे घरातील उष्णतेपासून थोडा दिलासा मिळावा म्हणून अनेक कुटुंबे उद्यानांमध्ये वेळ घालवत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version