शिवरायांच्या चरणी ‘छावा’ नतमस्तक
| रायगड | खास प्रतिनिधी |
बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल रायगड किल्ल्यावर दाखल झाला. त्याने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांना अभिवादन केले. शिवजयंतीचे औचित्य साधून विकी कौशल रायगडावर आला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवभक्त आणि चाहते उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात विकी कौशलचे रायगडावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित चाहत्यांसमोर त्याने ‘छावा’ चित्रपटातील काही संवाद सादर केले. त्याचा “शेर नहीं रहा, लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है…’’ हा संवाद ऐकताच संपूर्ण परिसरात जल्लोष उसळला.
शिवजयंतीचे औचित्य साधून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची घोषणा त्याने कालच केली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी तो पाचाड येथे दाखल झाला. रोप-वे मार्गाचा वापर करून तो गडावर दाखल झाला. यावेळी राज्यसदरेवर जाऊन त्याने मेघडंबरीतील शिवपुतळ्याचे दर्शन घेतले. महाराजांना अभिवादनही केले. यावेळी छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावाची टीमसुद्धा उपस्थित होती.
छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणार्या विकी कौशलला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या मानवंदनेत रायगडावर यावेळी सलामी देण्यात आली.