एक टक्क्यापेक्षा कमी नाममात्र एनपीए
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन 2023-24 या आर्थिक वर्षात ढोबळ एनपीएमध्ये 0.37 टक्क्यांनी घट झाली आहे. ढोबळ एनपीए 0.56 टक्के इतका आहे. हे एनपीए प्रमाण नाममात्र आहे. निव्वळ नफा 6 कोटी 10 लाख रूपये झाला आहे. आदर्शच्या एकत्रीत व्यवसायात 110 कोटी 50 लाख रूपयांनी वाढ झाली आहे. आर्थिक सक्षम, ढोबळ एन.पी.ए नाममात्र, उत्तम लाभता क्षमता असलेली आदर्श पतसंस्था आपल्या नावाप्रमाणे आदर्श काम करत आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.
सन 2022-23 या आर्थिक वर्षात आदर्श नागरी पतसंस्थेचा ढोबळ एनपीए 0.92 टक्के होता. त्यात सन 2023-24 या आर्थिक वर्षात 0.37 टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा एनपीए प्रमाण 0.56 टक्के आहे. तसेच, निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के आहे. आदर्श पतसंस्थेने सलग 16 वर्षे निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के राखले आहे, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली. सन 2023-24 या आर्थिक वर्षात संस्थेला ढोबळ नफा 8 कोटी 5 लाख रुपये झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 1 कोटी 29 लाख रूपये वाढ झाली आहे. संस्थेने 133 कोटी 66 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
आदर्श पतसंस्थेने 618 कोटी 57 लाख रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे. मागील वर्षी 508 कोटी 8 लाख रूपयांचा एकत्रीत व्यवसाय होता. आदर्शचे वसूल भागभांडवल 16 कोटी 74 लाख रूपये आहे. आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवी 358 कोटी 5 लाख रूपये आहेत. गेल्या वर्षी संस्थेच्या 302 कोटी 92 लाख रूपये ठेवी होत्या. त्यात यावर्षी 55 कोटी 14 लाख रूपयांनी वाढ झाली आहे. सन 2022-23 मध्ये संस्थेचे 205 कोटी 16 लाख रूपये कर्ज वाटप होते. सन 2023-24 मध्ये संस्थेचे 260 कोटी 52 लाख रूपये कर्ज वाटप झाले आहे. मुदतपूर्ण थकबाकी 7 कर्जदारांकडे आहे. त्याचे प्रमाण 0.01 टक्के असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.