4 तास 47 मिनिटात पूर्ण केले 114 किलोमीटर अंतर
तिरंगा झेंड्यासह सायकल फेरी
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील सायकलपटू अॅड गजानन डुकरे यांनी इंडियन फ्लॅग रनर अँड रायडर लिजेंड ऑफ भगतसिंग या नावाने आयोजित केलेली 114 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत अवघ्या 4 तास 47 मिनिटात पार केली. कर्जत ते वांगणी दरम्यान भारताचा तिरंगा झेंडा सायकलला बांधून 114 किलोमीटर अंतर डुकरे यांनी कमी वेळात पूर्ण केले असून त्यांनी यापूर्वी 73 आणि 93 किलोमीटर हे अंतर भारताचा राष्ट्रीय झेंडा लावून विक्रमी वेळेत पार करीत शहिदांना अभिवादन केले.
डुकरे हे पेशाने वकील तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष आवड असलेले व्यक्तिमत्त्व असून कराटे ब्लॅक बेल्ट असलेले डुकरे हे लेदर बॉल क्रिकेट मधील उत्तम खेळाडू आहेत. 15ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी 73 किलोमीटर हे अंतर भारताचा तिरंगा ध्वजासह कमी वेळेत पार करीत आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले होते.त्यानंतर 26 जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा फ्लॅग रनर अँड रायडर यांच्या कडून आयोजित या स्पर्धेत 93 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत पार करीत यश संपादन केले होते.शहीद भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त देश पातळीवर सायकल पटूसाठी 114 किलोमीटरचे अंतराची स्पर्धा आयोजित केली होती.
देशातील असंख्य सायकलपटू या स्पर्धेत 19 मार्च ते 27 मार्च या कालावधीत सहभागी झाले होते. हौशी सायकलपटू यांच्यासाठी आयोजित केलेली ही सायकल स्पर्धेचे 114 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी 25 तासांचा अवधी पंजाब येथील स्पर्धा आयोजक यांच्याकडून देण्यात आला होता.आठ फूट लांबीचा भारताचा तिरंगा झेंडा लावून अँड गजानन डुकरे यांनी हे 114 किलोमीटर लांबीचे अंतर 4 तास आणि 47 मिनिटात पार केले. डुकरे यांनी नेरळ खांडा येथील नागेश्वर मंदिर येथून सायकल फेरीला सुरुवात केली. आणि नेरळ ते कर्जत आणि कर्जत पासून वांगणी असा प्रवास करीत 114 किलोमीटर अंतर पूर्ण झाल्यावर सायकल वरून खाली जमिनीवर पाय ठेवला.त्यावेळी संपूर्ण सायकल फेरीत अँड गजानन डुकरे यांच्या सायकलच्या सोबत प्रवीण सकपाळ, अंकुश शेळके,सौरभ डुकरे आणि सूरज डुकरे पाटील हे साथी दुचाकी आणि कार मधून साथ देत होते.114 किलोमीटर एवढे अंतर डुकरे यांनी सायकल वरून एकदाही न थांबता 4 तास 47 मिनिटात पार केले.देश पातळीवर 6 तासात 114 किलोमीटर अंतर फजत 67 स्पर्धकांनी पूर्ण केले आहे अशी माहिती आयोजक यांच्याकडून देण्यात आली आहे. अँड डुकरे यांच्या या कामगिरी बद्दल कर्जत बार असोसिएशन तसेच नेरळकर यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.