मालमत्ता कराविरोधात उठविला आवाज
। पनवेल । वार्ताहर ।
मालमत्ता कराविरोधात शेतकरी कामगार पक्षाने जोरदार आवाज उठवला आहे. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि आमदार बाळाराम पाटील यांनी विधान परिषदेत याविरोधात शासनाने लवकरात लवकर हस्तक्षेप करून 31 मार्चनंतर येणारा दंड लावू नये, अशी मागणी केली आहे. दरम्यान, शेकापने लोकांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट कार्ड अभियान राबविले.
पालिकेतील टॅक्सवर दंड घेण्याचे अधिकारी आयुक्तांना आहेत, त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने कामोठे शहरात लोकांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट कार्डचा वापर केला. कामोठेमधील पोलीस स्टेशन समोर, गोकुळ डेअरी सेक्टर 18 आणि श्री साई मेडिकलजवळ पक्षाच्या पदाधिकार्यांनी पोस्ट कार्डचे अभियान राबवले होते. त्यास लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, पाचशेपेक्षा अधिक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच काही नागरिकांनी स्वतःहून आपापल्या इमारतींमध्ये कार्ड घेऊन गेले. एकूण आठशे प्रतिक्रिया जमा होतील, असे संघटक अल्पेश माने यांनी सांगितले.
बहुतेक नागरिकांनी पालिकेने कोणतीही सेवा न देता तसेच बाजूच्या नवी मुंबई, ठाणे पालिकेपेक्षा जास्त कर लावल्याने नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे, असे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षाचे हे अनोखे आंदोलन कामोठेकरांच्या चर्चेचा विषय ठरले असून, यासाठी शहर अध्यक्ष अमोल शितोळे, नगरसेवक शंकर म्हात्रे, अल्पेश माने, कुणाल भेंडे, सचिन झणझणे, अनिल हडवळे, दशरथ माने, उषा झणझणे, अभिजित खैरे, प्रमोद हडवले, सायली आगलावे, बाबू येवले, अनिल भताने, सुनील कर्पे आदी पदाधिकार्यांनी मेहनत घेतली.