भातशेतीला केळी बागेची जोड

शेतकरी आर्थिक उत्पन्न वाढीच्या प्रयत्नात
। पुरुषोत्तम मुळे । तळा ।
कोकणातील शेतकरी हा पावसाच्या भरोशावर आपला शेती व्यवसाय करीत आला आहे. त्यामुळे त्याला आर्थिक लाभ किती मिळू शकतो हे नक्की सांगता येत नाही. कारण कधी पाऊस नाही म्हणून शेतकरी भात पिकापासून दूर असतो तरी मुबलक पडणार्‍या पावसामुळे ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. अशा वेळी शेतकरी हवालदिल होतो. वर्षभर शेतात राबराब राबून मेहनत करून वर्षाला मिळणारे उत्पन्न हे कधी कधी खर्चापेक्षा कमी असते. अनेक वेळा काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत तर कधीकधी मजुरी परवडत नाही अशा वेळी पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी दुसरा पर्याय शोधत असतो. जेणेकरून टीच भर पोटाची खळगी भरण्यासाठी आर्थिक उत्पन्नात या पर्यायांमधून मिळेल. तळातालुक्यातील कासेवाडी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले रमण गोविंद महाडिक यांनी आपल्या शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून केळी लागवड करून आर्थिक उत्पन्न वाढीचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या एक एकर जागेत रमण महाडिक यांनी साधारणपणे 850 केळीची रोपे लागवड केली आहेत. तसेच ते या क्षेत्रात नवीनच आहेत.तालुक्यात केळी लागवडीचा प्रयोग तसा कोणीच अजूनही केलेला नाही. परंतु महाडिक यांचे मित्र हरिभाऊ बहिरे यांचे मार्गदर्शनाखाली केळीची शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कष्ट आणि मेहनत करणार्‍या रमण महाडिक यांना हरिभाऊ बहिरे केळी उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त केले.


केळीच्या पिकाला पाणी मुबलक लागते.त्यासाठी महाडिक यांनी आपल्या शेतात 250फूट खोल बोरिंग केली.दीड इंची पाणी लागल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.त्यासाठी त्यांना 80 हजार रुपये खर्च आला आहे. असे महाडिक सांगत होते. रोपे साधारणपणे पाच फूट अंतरावर लागवड केली आहेत. त्यासाठी तळा कृषी अधिकारी वाडकर यांनी देखील महाडिक यांना मार्गदर्शन केले तेरा महिन्यानंतर पीक हाती येते तेव्हा त्यापासून साडेचार ते पाच लक्ष रुपये उत्पन्न मिळेल. खर्च वजा जाता अंदाजे दिड दोनशे रुपये नफा होऊ शकतो. पण हे केव्हा पिकाला भाव बर्‍यापैकी मिळाला तरच. म्हसळा, मुरुड, रोहा, येथील व्यापारी शेतावर येऊन गेले. त्यांनी अंदाजे 12ते 14 रुपये किलो भावाने मागणी केली आहे. परंतु मी अजून तसा विचार केला नाही. असे रमण महाडीक सांगत होते.

Exit mobile version