चाहत्यांच्या आनंदात, बीसीसीआयच्या तिजोरीत होणार वाढ!
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
स्थानिक टी-20 लीग आयपीएलसाठी बीसीसीआय मोठी तयारी करत आहे. पुढील हंगामापासून, आयपीएल 2022मध्ये 8 ऐवजी 10 संघ असणार आहेत. बोर्डाने एका संघाची मूळ किंमत सुमारे 2 हजार कोटी रुपये ठेवली आहे. अशा स्थितीत बीसीसीआयला या 2 संघांकडून सुमारे 5 हजार कोटी मिळू शकतात. पुढील हंगामापासून 60 ऐवजी 74 सामने खेळले जातील. चालू हंगामातील उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहेत.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या दोन नवीन संघाबाबत चर्चा झाली. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले, कोणतीही कंपनी 75 कोटी रुपये देऊन बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. पूर्वी 2 नवीन संघांची मूळ किंमत 1700 कोटी रुपये मानली जात होती, परंतु आता मूळ किंमत 2000 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जर बोली प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडली, तर बीसीसीआयला किमान 5000 कोटी रुपयांचा नफा होईल, कारण अनेक कंपन्या बोली प्रक्रियेत रस दाखवत आहेत. बीसीसीआयला किमान 5000 कोटींची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात 74 सामने होतील आणि प्रत्येकासाठी ही फायदेशीर गोष्ट आहे, असेही या सूत्राने सांगितले.
नवीन संघांसाठी अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे या शहरांची नावे समोर आली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियम ही फ्रेंचायझींची निवड असू शकते, कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे. अनेक व्यावसायिक कंपन्या फ्रेंचायझी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोएंका, फार्मास्युटिकल कंपनी टोरेंट आणि एक बँक हे सर्व आयपीएलमध्ये त्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न करत आहेत.