कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू

कोविड नियमांचे व कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोविड-19 चा वाढता प्रादूर्भाव व ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांकरिता निर्बंध जारी केले आहेत.
रायगड जिल्ह्यात मागील काही दिवस कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता शासन आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, कोविड नियम व कोविड-19 अनुरूप वर्तनाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही आवश्यक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
हे निर्बंध रायगड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.10 जानेवारी 2022 च्या रात्री 12.00 वाजेपासून लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी जारी केले आहेत.
नागरिकांच्या हालचाली:- पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या समूहाला सकाळी 5.00 पासून ते रात्री 11.00 वाजेपर्यंत बाहेर फिरण्यासाठी बंदी राहील. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11.00 पासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत बंदी राहील.
शासकीय कार्यालयातील उपस्थिती :- कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालयप्रमुखांची लेखी परवानगी असल्याशिवाय कार्यालयात प्रवेशास मनाई असेल. प्रमुख कार्यालयांमध्ये नागरिकांशी चर्चेकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) ची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. शासकीय बैठकांकरिता ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) सुविधेचा वापर करण्यात यावा. कार्यालयातील किंवा बाहेरील अधिकारी/कर्मचाऱ्यांकरिता ही बाब लागू असेल. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळेमध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. सर्व शासकीय कार्यालयांध्ये कोविड अनुरुप पद्धती (CAB) चे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित विभागप्रमुख कार्यालयप्रमुख यांनी करावी. सर्व कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर इ. उपलब्ध ठेवण्यात यावेत.
खाजगी कार्यालयातील उपस्थिती:- कार्यालयाच्या व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात.कार्यालयात 50 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करावा. कार्यालये 24 तास सुरु ठेवून टप्याटप्याने काम करण्याबाबतही विचार करावा. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळविता येऊ शकेल, अशा प्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेबाबत नियोजन करावे. लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरणाचे दोन डोस पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. कार्यालयाध्ये कोविड अनुरुप पद्धती (CAB) चे पालन काटेकोरपणे होत असल्याची खातरजमा संबंधित कार्यालय व्यवस्थापन प्रमुख यांनी करावी. सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर इ. उपलब्ध ठेवावेत.
विवाह कार्यक्रम:- विवाह समारंभ कार्यक्रमाकरिता कमाल मर्यादा 50 व्यक्तींची राहील.
अंत्यविधी:- अंत्यविधीकरिता कमाल मर्यादा 20 व्यक्तींची राहील.
सामाजिक/धार्मिक/सांस्कृतिक/राजकीय कार्यक्रम :- सामाजिक/धार्मिक/सांस्कृतिक/राजकीय कार्यक्रम इ.करिता कमाल मर्यादा 50 व्यक्तींची राहील.
शाळा/विद्यालये/महाविद्यालये/कोचिंग क्लासेस:- सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दि.25 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील. तथापि, विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवावयाचे उपक्रम सुरु राहतील. वर्गातील अध्यापनाव्यतिरिक्त प्रशासकीय कामकाज व कार्यवाही नियमितपणे शिक्षकांकडून करण्यात यावे. शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास विभागांकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी. याशिवाय या विभागांना इतर बाबीकरिता करावयाच्या नियोजनाकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य अधिकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असेल.
स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर्स:- स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर्स हे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची मुभा असेल, तथापि, व्यायामशाळेत कोणतेही कार्य करताना मास्क परिधान करणे अनिवार्य राहील. व्यायामशाळेमध्ये लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहील. व्यायामशाळेमधील सर्व कर्मचारी यांनी लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केले असणे बंधनकारक राहील.
सलून/केशकर्तनालय/ब्युटीपार्लर:- ही ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. दररोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत ही दुकाने बंद असतील. दुकांनामध्ये केशकर्तनाशिवाय इतर सर्व प्रकारच्या सुविधा बंद राहतील. कोविड-19 चे अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे (CAB) काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. या ठिकाणी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहील. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केले असणे बंधनकारक राहील. या ठिकाणांमध्ये ए.सी.चा वापर करता येणार नाही.
क्रीडा स्पर्धा:- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्वनियोजित स्पर्धांना पुढील अटी व शर्तीनुसार परवानगी असेल, प्रेक्षकांना परवानगी नसेल, सर्व खेळाडू/स्टाफकरिता बायो-बबल लागू असेल, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धासंदर्भात केंद्र शासनाचे निर्देश लागू असतील, सर्व खेळाडू/स्टाफकरिता दर तीन दिवसांनी RT-PCR / RAT चाचणी करणे बंधनकारक असेल. गाव/शहर/तालुका/जिल्हा स्तरावरील कोणत्याही स्वरुपाच्या क्रीडा स्पर्धाच्या आयोजनास पूर्णपणे बंदी राहील.
मनोरंजनाची ठिकाणे प्राणीसंग्रहालय, वस्तुसंग्रहालय, गड-किल्ले आणि अन्य स:शुल्क ठिकाणी नागरिकांसाठी असलेले कार्यक्रम, स्थानिक प्रेक्षणीय स्थळे इत्यादी पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
शॉपिंग मॉल्स, बाजार संकुले :- ही ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि मॉल्सची एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्या याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल, अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावेत. कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, याकरिता संबंधित आस्थापना यांनी मार्शल्स नेमावेत. या ठिकाणी कोविड-19 संबंधित RT-PCR/RAT चाचणी करिता बुथ/किऑस्क उपलब्ध ठेवण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल. ही ठिकाणे दररोज रात्री 10.00 ते सकाळी 8.00 वाजेपर्यंत बंद असतील.
रेस्टॉरंट, उपहारगृहे :- ही ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि मॉल्सची एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्या याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल,अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावेत. कोविड अनुरुप वर्तन/निदेश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात यावा. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्री 10.00 ते सकाळी 8.00 पर्यंत दुकाने बंद असतील. पार्सल सुविधा/होम डिलीवरी सुरु ठेवता येईल.
नाट्यगृह/चित्रपटगृहे इत्यादी :- 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा असेल. सर्व अभ्यागत/प्रेक्षक यांच्या माहितीसाठी आस्थापनेच्या बाहेर दर्शनी ठिकाणी एकूण क्षमता आणि अभ्यागत/ प्रेक्षकांची संख्या दर्शविणारा सूचना फलक लावणे बंधनकारक राहील. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात यावा.याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील, नाट्यगृह/चित्रपटगृहे इ. दररोज रात्री 10.00 ते सकाळी 8.00 पर्यंत बंद राहतील. कोविड-19 नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे…
देशांतर्गत प्रवास :- महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या 72 तासापर्यंत आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत असणे बंधनकारक राहील. ही बाब हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक या तिन्ही मार्गानी प्रवास करणाऱ्या प्रवाशांस लागू असेल. रस्ते मार्गानी प्रवास करणारे वाहनचालक/क्लिनर्स/ अन्य स्टाफ यांना या बाबीचे पूर्ण पालन करणे बंधनकारक राहील.

कार्गो सेवा-वाहतूक, औद्योगिक उपक्रम, बांधकाम कार्ये इत्यादी :- लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या व्यक्तीकरिता सुरु राहतील.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था :- लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या व्यक्तीकरीता नियमितपणे सुरु असतील.

केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, वैधानिक संस्था, सार्वजनिक संस्था इत्यादीद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा :- राष्ट्रीय पातळीवरुन आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांकरिता केंद्र शासनाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. अशा परिक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिध्द करण्यास पुरेसे असेल. राज्य पातळीवरुन आयोजित होणाऱ्या परीक्षांसंदर्भात ज्या परीक्षांचे ओळखपत्र जारी करण्यात आले आहेत, अशा परीक्षा नियोजनाप्रमाणे घेता येईल तथापि इतर सर्व परीक्षांकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. सर्व परीक्षेदरम्यान कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/ नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे.

प्रवासासाठी अत्यावश्यक कारणे :- वैद्यकीय तातडी, अत्यावश्यक सेवा (अत्यावश्यक सेवाची यादी), विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानके येथे जाणे किंवा येण्यासाठी वैध तिकिटासह, 24 तास सुरु राहणाऱ्या कार्यालयासाठी विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांचा प्रवास अत्यावश्यक मानला जाईल, दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स तसेच ई-कॉमर्स किंवा डिलिवरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील, यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बंद करण्यात येईल. या कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित वेळानंतर त्या आस्थापनेने RAT (Rapid Antigen Test) / RT-PCR चाचणी करुन घेणे गरजेचे आहे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या बंधनामध्ये बदल करण्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचवू शकेल, कोविड व्यवस्थापनाच्या कामासाठी राज्य सरकारची कार्यालये, किंवा राज्य सरकारव्दारे अर्थसहाय्यित अन्य संस्थाचे कर्मचारी आणि संसाधने यांची मागणी करण्याचे संपूर्ण अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राहतील.

Exit mobile version