चिखली प्रा. आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण
। अलिबाग । वार्ताहर ।
शेकापच्या पाठिंब्यामुळेच अदिती तटकरे या पालकमंत्री पदावर विराजमान झाल्या आहेत, याचा विसर त्यांनी कदापि पडून देऊ नये, असा सूचक इशारा शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी दिला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोमवारी (दि.21) जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, जि. प. अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, अॅड.सभापती निलिमा पाटील जि.प. सदस्य अॅड. आस्वाद पाटील, जि. प.सदस्या चित्रा पाटील,सीईओ डॉ. किरण पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री अदिती तटकरे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होत्या. पण, त्या न आल्याने आ.जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्या पालकमंत्रीपदावर बसल्या आहेत त्या शेकापमुळेच याचा विसर त्यांना पडू नये, असे वक्तव्यही त्यांनी केले. यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रातील उत्तम सेवा पुरविणार्या हॉस्पिटल्समध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राचा पहिला क्रमांक लागेल. अपेक्षांच्या पलिकडे जाऊन चित्रा पाटील यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र साकारले आहे.
जिल्हा नियोजन समितीमध्ये आपलं प्रभूत्व आहे, आणि ते कायम राहणार आहे. पोयनाडच्या विकासासाठी शेकाप कायम कटिबद्ध असून पोयनाड रस्ता आणि परिसराचा विकास शेकापनेच केला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात सिटीस्कॅन मशिनदेखील लवकरच आणण्यात येईल. आदिवासी हा पक्षाचा शेकापचा आत्मा असून त्यांच्या विकासासाठी शेकापने कायम प्रयत्न केले आहेत. – आ.जयंत पाटील
पोयनाडलाही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साकारणार
शेकापच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महाद्वार खुले केले. त्याचप्रमाणे आता शेकाप क्रिडा क्षेत्रात आवड असणार्या खेळाडूंसाठी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्याकडे भर देत आहे. पोयनाड परिसरातील अनेक खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करुन परिसराचे नाव उंचावले आहे. या विभागातील खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शेकापच्या माध्यमातून भव्य स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यात येईल. जेणेकरुन या परिसरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उंचावेल.असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
शेकापक्ष लाटेवर नाही, विकासकामावर निवडून येतो – पंडीत पाटील
रायगड जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांना घेतल्याशिवाय कोणालाच राजकारण करता येणार नाही. शेकापक्ष कधीच कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करत नाही आणि दुसर्याने तसं आमच्या बाबतीत केलं तर आम्ही सहनपण करत नाही. शेकापक्ष लाटेवर नाही तर विकासकामावर निवडून येतो. शेकाप भाजपासारखी नौटंकी करत नाही. बंगले नसले तरी बंगले आहेत असे सांगून बातमी लावणार परत खोटं बोलणार, हे शेकापच्या भुमिकेत बसत नाही. जयंत पाटील यांच्या कृपेमुळे तटकरे आज दिल्लीत आहेत. पण आदिवासी नागरिकांसाठी उभारलेल्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी निमंत्रण असूनही त्यांच्यासह पालकमंत्री आले नाहीत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 सदस्य तर शेकापचे 22 तरी निधी वाटप समान होतो. ही विचार करण्याची बाब आहे असे ते म्हणाले.