। मुंबई । प्रतिनिधी ।
विधानभवन परिसरात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नागपूर घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. सरकार चालवत येत नसल्याने सरकार दंगली पेटवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, भाजपला महाराष्ट्राचे मणीपूर करायचे असून राज्यात शिल्लक असलेले उद्योगधंदे गुजरातला पाठवण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
यावेळी ते म्हणाले की, नागपूरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. या शहरातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्याच शहरात अशी घटना घडली आहे. ही घटना घडत होती, त्यावेळी पोलीसच उशीरा आले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा घटना घडतात किंवा त्याची ठिणगी पडते, तेव्हा गुप्तचर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे येणे गरजेचे असते. तसेच, हे सरकार सत्तेत आल्यानंतर बीड, परभणी, पुणे येथे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्याची माहिती प्रसारमाध्यमातून मिळते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाला याची माहिती मिळते का, असाही सवाल उपस्थित होत आहे. सरकारची गुप्तचर यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांना काही माहिती आहे किंवा नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचा मणीपूर करणे, प्रश्न पेटवत ठेवणे हा भाजपचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. त्यातून महाराष्ट्रात जे काही थोडे उद्योग किंवा गुतंवणूक येण्याची शक्यता आहे. अशा अस्थिरतेमुळे त्यांना गुजरातमध्ये पाठवायचे, हा भाजपचा डाव आहे. भाजपच्या हाती सत्ता येत नाही किंवा सत्ता आली तरी त्यांना सरकार चालवणे जमत नाही, तेव्हा दंगली घडवून जनतेला त्यात गुंतवून ठेवायचे, हेच भाजपचे धोरण आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.