पाण्यावाचून आदिवासींची तडफड; सर्वत्र संतापाचे वातावरण

प्रशासन थोपटतंय स्वतःची पाठ; 685 पैकी 300 आदिवासीवाड्या तहानलेल्या

| रायगड | आविष्कार देसाई |

जिल्ह्यात तब्बल 685 आदिवासीवाड्या आहेत. पैकी 300 हून अधिक आदिवासीवाड्यांवरील नागरिक शुद्ध पाण्यावाचून तडफडत आहेत. रायगड जिल्हा परिषद मात्र रोहा तालुक्यातील ताम्हाणशेत आदिवासीवाडीला पाणी दिले म्हणून स्वतःची स्वतःच पाठ थोपटून धन्यता मानत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रोहा तालुक्यातील तांबडी ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजना कार्यान्वित झाल्याने ताम्हाणशेत आदिवासीवाडी पाणीदार झाली आहे. या आदिवासीवडिवरील 304 कुटुंबांना घरोघरी नळ कनेक्शन देऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सदर वाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी साठवण विहीर बांधण्यात आली असून, सदर विहिरीत पुरेसे पाणी शिल्लक आहे, असा दावा जिल्हा परिषदेने केला आहे. ही बाब जरी चांगली असली, तरी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या प्रशासनाने अन्य आदिवासीवाड्यांवरील प्रश्‍नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील या विदारक चित्राची माहिती डॉ. बास्टेवाड यांना त्यांचे संबंधित अधिकारी देतात की नाही, हेदेखील तपासून पाहिले पाहिजे.

रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेतीन हजार मि.मी. पाऊस पडतो. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात मोठी धरणं नसल्याने कोट्यवधी लीटर पाणी हे समुद्राला जाऊन मिळते. तसेच ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आता विस्मृतीत गेली का, असाही प्रश्‍न पडतो. उपलब्ध असणार्‍या धरणांची क्षमता कमी असल्याने त्यामध्ये कमी पाणीसाठा होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात होते.

जिल्ह्यात 685 आदिवासीवाड्यांपैकी 300 हून अधिक आदिवासीवाड्यांवर सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. जलजीवन मिशनच्या योजना राबवण्यात येत असल्या तरी, या ठिकाणी त्या कधी पोहोचणार? आदिवासीवाड्यांवर माणसं राहात नाहीत का?

संतोष ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते

खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडीवर पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. महिलांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. ज्या डवर्‍यातून (पाण्याचे स्त्रोत) पाणी आणले जाते. ते पाणी अशुद्ध आहे; परंतु आम्हाला तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. जलजीवनचे काम प्रस्तावित असल्याचे सरकारी अधिकारी सांगतात. आम्हाला मुबलक आणि शुद्ध पाणी देण्याची सरकार आणि प्रशासनाची आहे.

संतोष घाटे, ग्रामस्थ,
करंबेळी आदिवासीवाडी
Exit mobile version