। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या नेमणूका जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केल्या आहेत. 4500 कर्मचारी तसेच भरारी व स्थिर पथकेही तैनात केली आहेत.
जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यात कणकवलीसाठी कणकवलीचे उपविभागीय अधिकारी जगदिश काकतकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी व कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. कुडाळसाठी कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांची निवडणूक निर्णय अधिकारी व कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सावंतवाडीसाठी सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची निवडणूक निर्णय अधिकारी व सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान असले, तरी पूर्व तयारी करण्यासाठी व निवडणूक प्रशिक्षण देऊन कर्मचार्यांना तयारीत ठेवण्यासाठी 4500 निवडणूक कर्मचारी तैनात केले आहेत. जिल्ह्यात 921 मतदान केंद्रे असून मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन कर्मचारी तसेच 23 नोव्हेंबरला होणार्या मतमोजणीसाठी लागणारे कर्मचारी आणि कार्यालयीन कामासाठी लागणारे कर्मचारी मिळून 4,500 निवडणूक कर्मचारी म्हणून घेतले आहेत. राजकीय कार्यक्रमांवर भरारी पथकांचे लक्ष निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणारी बेकायदेशीर दारू वाहतूक, पैसे, अमली पदार्थ यांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे तसेच संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी व्हीडिओ सर्व्हलन्स टीम, स्थिर व भरारी पथके नेमली असून जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यांवर ही पथके तैनात केली आहेत. यातील भरारी पथके ही राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत वेळ ठेवली आहे. 20 नोव्हेंबरला होणार्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता सायंकाळी सहापर्यंत मुदत दिली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाकडून उपलब्ध झाली आहे.