अंगणवाडी सेविकांची पुन्हा फरफट
| पेण | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. योजनांपेक्षा कार्यक्रमातील काही घडामोडींनी उपस्थितांचे अधिक लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांनाच कार्यक्रमाला बोलावण्यात आल्याची चर्चा रंगली.
विविध विभागातील कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याचे बोलले जात होते. यापूर्वीही अशा शासकीय कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, व्यासपीठावर उपस्थित असलेलल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यक्रम सुरू असताना काही काळ डुलकी घेत असल्याचे दृश्य उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केले. त्यामुळे कार्यक्रमानंतर शासकीय योजनांपेक्षा सीईओंची डुलकी याच विषयाची अधिक चर्चा रंगली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मार्गदर्शन करताना रायगड जिल्ह्यातील सामाजिक स्थितीचा उल्लेख केला.
रायगड जिल्ह्यात हुंडाबळीची प्रकरणे होत नाहीत तसेच माझ्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्येची घटना घडलेली नाही, असे ते म्हणाले. लॅप्टोस्पायरोसिसच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गमबूट वाटपाचा निर्णय राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला व बालविकास आदी विभागांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे आणि इतर साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच वनहक्क, आर्थिक सहाय्य, बचत गट लाभ, नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई, पीएम स्वामित्व योजना, दिव्यांग व अंध कल्याण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, आयुष्यमान भारत कार्ड आदी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांमध्ये शासकीय शिबिरातील व्यवस्थापन, अंगणवाडी सेविकांची झालेली फरफट आणि व्यासपीठावरील डुलकी याच मुद्द्यांवर अधिक चर्चा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भाजप नेत्याच्या भाषणाप्रसंगी झोप अनावर
पेण येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले या व्यासपीठावर डुलकी घेत असल्याचे दृश्य उपस्थितांच्या नजरेत भरले. मान्यवरांची भाषणे सुरू असतानाच त्या काही वेळ डुलक्या घेत असल्याचे उपस्थितांनी पाहिल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ काही उपस्थितांनी टिपल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे कार्यक्रमानंतर शासकीय योजनांपेक्षा व्यासपीठावरील या प्रसंगाचीच अधिक चर्चा झाली. उपस्थितांपैकी काहींनी या दृश्यावर आश्चर्य व्यक्त केले, तर काहींमध्ये हलकाफुलका हशाही पिकल्याचे सांगण्यात आले.






