| अलिबाग | प्रतिनिधी |
भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन शुक्रवारी (दि.15) जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने विविध देशभक्तीपर गीतांसह सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
अलिबागमधील पोलीस मुख्यालयात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटाने मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे. यावेळी पोलिसांमार्फत मानवंदना दिली जाणार आहे. तसेच देशभक्तीपर कार्यक्रमदेखील होणार आहेत.
अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण होणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक, नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायत अशा अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.







