दोन हजार 543 अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया बुधवारी (दि.20) सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत पार पडली. एकूण 69.15 टक्के मतदान झाले. 17 लाख 21हजार 38 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी (दि.23) होणार्या मतमोजणीसाठी दोन हजार 543 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, इतर पथकातील अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश असणार आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघांतील 24 लाख 88 हजार 788 पैकी 17 लाख 21 हजार 38 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये आठ लाख 38 हजार 459 महिला व पुरुष आठ लाख 82 हजार 555 आणि इतर 24 मतदारांनी मतदान केले. आता मतमोजणीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. काही तासाच शिल्लक राहिले असून, कोणाच्या झोळीत किती मते पडणार हे चित्र शनिवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
पनवेल विधानसभा मतदार संघातील मतमोजणी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीसमोर, पनवेल ए.आर. कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज, पनवेल, ठाणा नाका जवळ येथे मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी 24 टेबल असून, एकूण 25 फेर्या होणार आहेत. मतमोजणीसाठी 389 अधिकारी व कर्मचारी तसेच इतर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी निरीक्षक म्हणून दुनी चंद्र राणा काम पाहणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रशासकीय भवन, पहिला मजला येथे होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल असून, 26 फेर्यांतून मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी 321 अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी निरीक्षक म्हणून जगदीप धंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उरण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी जासई येथील दि.बा. पाटील मंगल कार्यालय येथे होणार आहे. त्यासाठी 14 टेबल असून, मतमोजणीच्या 25 फेर्या होणार आहेत. मतमोजणीसाठी 284 अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. मतमोजणी निरीक्षक म्हणून राजेश कुमार आयव्ही काम बघणार आहेत. पेण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी के.ई.एस. लिटील एंजल स्कूल येथे होईल. मतमोजणीसाठी 14 टेबल असून, 27 फेर्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी 291 अधिकारी, कर्मचारी असून, मतमोजणी निरीक्षक म्हणून संतोष कुमार राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी खंडाळेमधील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेर्यांची संख्या 27 आहे. मतमोजणीसाठी 356 अधिकारी व कर्मचारी असून, मतमोजणी निरीक्षक म्हणून रुही खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय भवन, पहिला मजला, श्रीवर्धन येथे मतमोजणी होणार असून, मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेर्यांची संख्या 25 आहे. मतमोजणी पर्यवेक्षकांसह 220 अधिकारी व इतर पथकातील अधिकारी कर्मचार्यांची असणार आहेत. मतमोजणी निरीक्षक म्हणून सतीश कुमार एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड बहुउद्देशीय सभागृह येथे होणार असून, मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. फेर्यांची संख्या 28 आहे. मतमोजणीसाठी 292 अधिकारी व कर्मचारी असणार आहेत. निरीक्षक म्हणून आदित्य कुमार प्रजापती हे काम बघणार आहेत. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मीडिया कक्ष उभारण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आहे.
मतदानावर दृष्टीक्षेप
मतदारसंघ | एकूण झालेले मतदान | टक्के |
पनवेल | तीन लाख 82 हजार 335 | 58.63 |
कर्जत | दोन लाख 40 हजार 10 | 75.30 |
उरण | दोन लाख 62 हजार 747 | 76.80 |
पेण | एक लाख आठ हजार 805 | 73.02 |
अलिबाग | दोन लाख 36 हजार 244 | 77.15 |
श्रीवर्धन | 81 हजार 747 | 61.37 |
महाड | दोन लाख 12 हजार 16 | 71.53 |