| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील नागाव-म्हातवली परिसरात बेकायदेशीर प्लांटने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पर्यावरण कायद्याला आणि जनतेच्या आरोग्याला तिलांजली देत सुरु असलेला हा प्लांट, जिल्हाधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या छत्रछायेखाली फोफावत आहे. ग्रामपंचायत नागावने 1998 साली तब्बल 5 लाख रुपये खर्च करून गावासाठी पिण्याच्या पाण्याची विहीर उभारली होती. मात्र, प्लांटमधून बाहेर टाकण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्याने व काँक्रिट कचऱ्याने ही विहीर आज संपूर्णपणे दूषित झाली असून, गावकऱ्यांचा हक्काचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद पडला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या बेकायदेशीर प्लांटच्या मागे ग्रामपंचायतीतील विद्यमान सदस्यांचा थेट सहभाग असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच ग्रामपंचायत उघडपणे या धंद्याची पाठराखण करत असल्याची चर्चा जनतेत आहे. त्याहून गंभीर म्हणजे, पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘इयर’ विभाग यांची भूमिका ही सगळ्यात संशयास्पद आहे. धूळ, आवाज, केमिकलयुक्त पाण्याचा खुलेआम कहर होत असताना हे सर्व विभाग कानावर हात ठेवून गप्प आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात असतानाही त्यांचे दुर्लक्ष हा सरळसरळ जनतेच्या जीवाशी खेळ ठरत असल्याचे स्थनिक नागरिकांकडून बोलले जात आहे.







