| उरण | प्रतिनिधी |
भाड्याच्या खोलीत पानटपरी चालवणारा सोनू काही वर्षांत थेट कोट्याधीश कसा झाला, हा प्रश्न आज उरणकरांच्या चर्चेत अग्रस्थानी आहे. साधा पानटपरी चालक, जो कालपर्यंत सुगंधी चुना लावून ग्राहकांना पान देत होता, तोच आज द्रोणागिरी नोडमधील लाखोंच्या सदनिकेत वास्तव्याला गेला आहे. एवढेच नाही तर गाळा व सदनिका विकत घेऊन नव्या व्यवसायाचे साम्राज्य उभारण्याच्या तयारीत आहे. एवढा पैसा नेमका कुठून आला? हा चमत्कार नसून नशेच्या काळ्या धंद्यातून मिळालेली गोड कमाई असल्याचा ठाम संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. जनतेचा आरोप आहे की, सोनूचा हा उदय साध्या पानव्यवसायातून झालेला नाही. पान व गुटखा विकणे हा बहाणा असून प्रत्यक्षात चरस, गांजा आणि इतर नशेच्या पदार्थांची विक्रीच त्याच्या संपत्तीमागचे खरे कारण आहे. पानटपरीच्या आडून उघडपणे चालणाऱ्या या गोरखधंद्याला सरकारी यंत्रणांचा मूक आशीर्वाद मिळाल्याशिवाय सोनूचे साम्राज्य एवढ्या झपाट्याने वाढणे शक्यच नाही. स्थानिक पोलीस, अन्न-औषध प्रशासन, तसेच इतर संबंधित संस्था या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत का, असा गंभीर प्रश्न उरणकरांमधून उपस्थित केला जात आहे.







