| उरण | प्रतिनिधी |
निवडणूक कोणतीही असो उमेदवार कोण असणार? त्याबाबत कायमच कमालीची उत्सुकता असते. तीन ते चार वर्षांची दीर्घ प्रतीक्षा, राजकीय उत्सुकतेचा धगधगता प्रश्न आणि नगरपरिषदेवर चाललेले प्रशासकीय राज्य या सर्वांवर पडदा पडला आणि नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या संभाव्य उमेदवारांचे स्वप्न भंगले. अनेक पुरुषांनी देव पाण्यात घातले होते पण अनेकांचा पत्ता कट होऊन आता नगरपालिकेत महिलांचे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उरणमध्ये नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना आणि महिला पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार, ही आशा पल्लवीत झाली. मात्र, अनेक राजकीय पुढारी आता त्यांच्या सौभाग्यवती, मुलगी किंवा कुटुंबातील इतर महिलांचा चेहरा पुढे करीत असल्यामुळे पक्षातील महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पक्षाच्या कार्यासाठी महिला कार्यकर्त्या लागतात; मात्र, उमेदवार म्हणून घरच्या गृहमंत्र्यांचा विचार होत असेल तर पक्ष कार्यासाठीही त्यांना घराबाहेर का काढत नाहीत, अशाही चर्चा आता रंगू लागल्या आहेत. एकीकडे सौभाग्यवती किंवा मुलींच्या प्रचारासाठी पुढारी पती किंवा बापाची प्रतिष्ठा पणाला लागली असताना दुसरीकडे पक्षातील महिला कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ आली आहे.





