धूप प्रतिबंधक बंधार्याच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असलेल्या आक्षी, साखर गावाला उधाणाचा धोका निर्माण झाला आहे. गावांमधील तीन हजारांहून अधिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी वारंवार करूनदेखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप आक्षीचे उपसरपंच आनंद बुरांडे यांनी केला आहे.
आक्षी हे गाव पर्यटनाच्यादृष्टी महत्त्वाचे असले, तरीही एक ऐतिहासिक भूमी म्हणूनदेखील आक्षीकडे पाहिले जाते. रायगड जिल्ह्यातील आक्षी गावात मराठी भाषेतील सर्वाच प्राचीन शिलालेख सापडला आहे. आक्षीला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. अलिबागबरोबरच आक्षीतील पर्यटनाला पर्यटक अधिक पसंती देतात. त्यामुळे आक्षीमध्ये दर आठवड्याला साधारणतः पाचशेहून अधिक पर्यटक भेट देत असल्याची माहिती समोर येत आहे. वर्षाला दोन लाखांहून अधिक पर्यटक आक्षीमध्ये येतात. आक्षी गावासह साखर, रायवाडी परिसरात तीन हजारांहून अधिक नागरिक समुद्रकिनारी राहतात. मासेमारीबरोबरच इतर व्यवसाय करून ही मंडळी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. परंतु, याच नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. उधाणाच्या काळात आक्षीसह साखर व रायवाडी किनार्यांना मोठ्या प्रमाणात लाटांचा मारा बसत आहे. परिणामी, येथील किनार्याची धूप होऊ लागली आहे.
भविष्यात किनार्यावरील गावांना त्या उधाणाचा धोक निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी शासनाकडे गेल्या चार वर्षांपासून मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या मागणीचा प्रस्ताव धूळ खात आहे. परंतु, त्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
आक्षी, साखर येथील किनार्यावरील होणारी धूप रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पत्र प्राप्त झाले आहे. किनार्यावरील धूप प्रतिबंधक बंधारे उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची आहे. त्यानुसार संबंधित विभागाला मागणी पत्र पाठविण्यात आले असून, कार्यवाही करण्याची सूचनाही केली आहे.
– संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी
आक्षी, साखर, रायवाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप झाली आहे. उधाणाचे पाणी पावसाळ्यात गावात शिरण्याची भीती कायमच राहिली आहे. गावांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडे धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून करीत आहोत. परंतु, अजूनपर्यंत त्याची दखल घेतली नाही. गावांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी.
– आनंद बुरांडे, उपसरपंच, आक्षी
आक्षीला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक किनारी येतात. साखर, आक्षी, रायवाडी ही किनार्यालगत गावे आहेत. सतत उधाणाबरोबरच लाटांच्या मार्यामुळे किनार्याची धूप होऊ लागली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
– रश्मी पाटील, सरपंच