गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार रखडले
| रायगड | आविष्कार देसाई |
पुरस्कार छोटा असो वा मोठा ते नेहमीच प्रेरणा देणारे असतात. परंतु, ते वेळेत जाहीर होऊन त्याचे वितरण झाले, तर त्या पुरस्कांराना महत्त्व प्राप्त होते. गंभीर बाब म्हणजे, रायगड जिल्हा परिषदेवर 21 मार्च 2022 सालापासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यानुसार तब्बल तीन वर्षांपासून आदर्श शिक्षकांचे पुरस्कार रखडले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कारांची सलग तीन वर्षांची यादी वेळोवेळी जाहीर केली आहे. मात्र, माध्यमिक विभागाची यादी अद्याप अंतिम झाली नसून, पुरस्कार वितरणही झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. समाजाला आदर्श वाटावा असे काम करणार्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्कारांमुळे संबंधितांना काम करण्याची नवी ऊर्जा प्राप्त होते, तर इतरांसाठी प्रेरणादायी असते. म्हणून सरकारने पुरस्कार देण्याची प्रथा सुरु केली आहे. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील प्रत्येकी एका प्राथमिक आणि माध्यामिक शिक्षण विभागातील शिक्षकाची निवड करण्यात येते. तसेच विशेष दिव्यांग पुरस्कारासाठी एका अशा एकूण 16 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो.
प्राथमिक शिक्षण विभागाची यादी दरवर्षी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु, माध्यमिक शिक्षण विभागाची यादी गेल्या तीन वर्षांत रायगड जिल्हा परिषदेने अंतिम केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. यंदा 2024 यावर्षीदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे माध्यमिक विभागातील कोणत्या शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार मिळणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गेली दोन वर्षे कोरोनाचा कहर असल्याने शिक्षकांना पुरस्कार देण्याचा मोठा सोहळा पार पडला नव्हता. माध्यमिक शिक्षकांना पुरस्कार देण्याची अंतिम यादी अद्याप अंतिम झालेली नाही.
गेल्या तीन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुस्कारांचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही संकल्पना पुसली गेली आहे का, असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित होता. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतन श्रेणी लागू करु नये, असा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने 4 सप्टेंबर 2018 रोजी काढला आहे. याविरोधात विविध शिक्षक संघटना न्यायालयीन लढाई लढत आहेत. 2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. त्यामुळे अन्य विकासाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करणे गरजेचे आहे.
– संदीप वारगे, उपाध्यक्ष,
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य