गुरेमालकांचा निष्काळजीपणा ठरतोय प्रवाशांच्या जीवाशी खेळ
| धाटाव | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कोलाड, खांब, सुकेळी खिंड विशेषतः वाकणच्या पुलावर रस्त्यात गुरे उभी अथवा बस्तान मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असून, अपघातांच्या प्रमाणातही वाढ होताना दिसते. संबंधित गुरांच्या मालकांचा निष्काळजीपणा येथील प्रवासीवर्गाच्या जीवाशी अक्षरशः खेळ खेळत असल्याने प्रवासी, वाहनचालक, दुचाकीस्वार मात्र चांगलेच त्रस्त आहेत.
रोहा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी आपल्याजवळील शेतजमिनी मुंबई, पुणे, दिल्लीकडील धनिकांना विकल्या असून, गेली दहा ते बारा वर्षांपासून जमिनी विकण्याचा व्यवसाय जोमाने सुरु आहे. जमिनीच्या पैशांमुळे जनावरांकडे दुर्लक्ष होत असून, आपल्याकडील शेती, जमीन विकलेल्या शेतकर्यांनी गुरांना मात्र वार्यावर (मोकाटच) सोडले आहे. जमिनी घेतलेल्या मालकांनी चहूबाजूने कंपाऊंड करून घेतल्यामुळे गुरांना वेळेवर खाण्यासाठी चारा आणि चरण्यासाठी जागाच उरली नसल्यामुळे ही गुरे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध बस्तान मांडून बसत आहेत, तर रस्त्यालगत असलेल्या हॉटेलच्या बाजूला फिरत असताना दिसत आहेत. यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे, तर वाहतूक कोंडी निर्माण होऊन अंधारात ही गुरे झटकन लक्षात न आल्याने अपघात होत आहेत.
गुरांना अपघात झाल्यास गुरे जखमी झाल्यानंतर त्यांच्या मालकांना जाग येते. नंतर अपघात झालेल्या वाहन चालकाकडून मग जबरदस्तीने भरपाई मागण्याचे प्रकार घडत आहेत.रस्त्यावर बसलेल्या गुरांमुळे अपघातग्रस्त एखादा प्रवासी जखमी झाला तर गुरांचे मालक मात्र हेतुपुरस्सर कानाडोळा करताना दिसतात. दरम्यान, रस्त्यावरील मोकाट गुरे चोरण्याच्या असंख्य घटना ताज्या असताना हीच मोकाट गुरे मालकांनी चोरट्यांना आंदण तर दिली नाहीत ना, असाही प्रश्न समोर येत आहे.
दरम्यान, रस्त्यावर जागोजागी बस्तान मांडून बसलेल्या मोकाट गुरांचा बंदोबस्त संबंधित प्रशासनाकडून करण्यात यावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे. मात्र, याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरजही निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाकणपासून कोलाडपर्यंत मोकाट गुरांचे कळप रस्त्यावर वाट अडवून बसलेले असतात. याठिकाणी रस्त्यावरून प्रवास करताना गुरांचा प्रचंड त्रास होत आहे. गुरांच्या मालकांनी आपापल्या गुरांची काळजी घेऊन रस्त्यावर सोडू नये, तर संबंधितांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
– गणेश म्हस्के, प्रवासी (कोलाड)
या रस्त्यावरून नेहमी आम्ही टेम्पो, ट्रक, कंटेनर अशी वाहने चालवत असतो. रस्त्यात बसलेली गुरे वाहने हॉर्न वाजवूनसुद्धा उठत नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. हा महामार्ग आहे की गुरांच्या आंदोलनाचा महामार्ग, असा प्रश्न पडतो.
– प्रतिक करंजे, वाहन चालक (रोहा)