क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा बी.कॉमला प्रवेश

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

टीम इंडियाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठामध्ये बी.कॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. याबाबतची माहिती घोडावत विद्यापीठाचे विश्‍वस्त विनायक भोसले यांनी दिली. तिच्या प्रवेशाविषयी भोसले म्हणाले की, स्मृती मानधनाने बी.कॉम प्रवेशासाठी संजय घोडावत विद्यापीठाची निवड केली, हा आमच्यासाठी गौरव आहे. तिच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू.

दरम्यान, संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्मृती मानधनाचे प्रवेश घेताना स्वागत केले. विद्यापीठाच्या शिरपेचात हिरा गवसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, विद्यापीठ नेहमीच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना पाठबळ देत असते. यापूर्वी 18 वर्षाखालील गटात लॉन टेनिस प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणार्‍या ऐश्‍वर्या जाधवला आम्ही प्रवेश देऊन सर्वतोपरी मदत करत आहोत. येथील क्रीडापटू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. विद्यापीठाची घोडदौड सर्वोत्कृष्टतेकडे होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. योगेश्‍वरी गिरी यांनीदेखील स्मृती मानधनाचे स्वागत केले.

Exit mobile version