पीळदार शरीरयष्टीसाठी तरुणाईला घातक स्टेराइडचे व्यसन

उरण | वार्ताहर |
विविध चित्रपटांतील अभिनेत्यांचे पिळदाार शरीर पाहून तरुणाईच्या मानगुटीवर सिक्सपॅकचे भूत बसले आहे. शरीर कमावताना सध्या मोठ्या प्रमाणात शॉर्टकटचा अवलंब केला जात आहे. मात्र, हाच शॉर्टकट त्यांना मृत्यूच्या अगदी जवळ नेत आहे. प्रत्येकालाच आता पिळदार शरीर बनवायचे आहे. यासाठी गल्लोगल्ली उभ्या राहिलेल्या जिमचा तरुण आधार घेताना दिसतात. अशा काही जिममध्ये असणारे जिम ट्रेनर पाहून आपल्याला वाटते की, आपलेसुद्धा तसेच सिक्सपॅक व्हावेत. यासाठी पाहिजे तो शॉर्टकट आजमावण्याचे प्रकार घडत आहेत.
शरीरयष्टी बनवण्यासाठी स्टेरॉइड आणि सल्पिमेंटचा वापर सर्रास होताना दिसतो. प्रत्येकाची शरीरयष्टी त्याची रचना वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीराला स्टेरॉइड किंवा सप्लिमेंट परिणामकारक ठरेल असेही नाही. योग्य मार्गदर्शन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर केला, तर ते तुमच्या जिवावर बेतू शकते.
सध्या विविध वाहिन्यांवर सिक्सपॅक तयार करण्यासाठी विविध कृत्रिम औषधे, सप्लिमेंट पावडर अशा विविध प्रॉडक्टच्या जाहिराती सुरु असतात. त्या जाहिरातींना बरेच तरुण भुलतात. स्वतःच्या स्वतः उपाय करतात आणि गोत्यात येतात. काहींना तर दोन महिन्यांत सिक्सपॅक हवे असतात. स्टेरॉइडची विक्री थांबविण्यासाठी स्वतंत्र कायदा आणता येईल का? याबाबत सरकार विचार करत आहे. उत्तम व निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. शरीर पीळदार बनविण्यासाठी मेहनत करावी.

Exit mobile version