अ‍ॅड.शिरीष पाटील स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धा

फायटर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

| पोयनाड | वार्ताहर |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.अ‍ॅड.शिरीष पाटील स्मृतीचषक ज्युनियर गटाच्या एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघ फायनल मध्ये दाखल झाला आहे.


उपांत्य फेरीच्या सामन्यात माणगाव संघानी प्रतीक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाचा 41 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यासाठी प्रवेश निश्‍चित केला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या माणगाव संघांनी 40 षटकांमध्ये 172 धावा धावफलकावर नोंदवल्या. निनाद जाधव यांनी सुरेख फलंदाजी करत सर्वाधिक 45 धावांचे बहुमूल्य योगदान संघाला दिले. त्याला कौतुक शिगवण व आयुष जुमारे यांनी प्रत्येकी 18 धावा काढत दुसर्‍या बाजूने साथ दिली. पनवेल संघाकडून ध्रुव शारदा यांनी 3 तर तनीषा शर्मा आणि आर्यन जाधव यांनी 2 फलंदाज बाद केले. 172 धावांचा पाठलाग करतांना पनवेल संघांनी 33 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 131 धावांपर्यंत मजल मारली. मधल्या फळीतील धावखुरा गुणवान फलंदाज पार्थ पवार यांनी एकाकी झुंज देत सर्वधिक 63 धावा काढल्या. माणगाव संघाकडून वैभव दळवी, कौतुक शिगवण, आरुष जाधव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. माणगाव संघनी उपांत्य फेरीचा सामना 41 धावांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

प्रतीक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाने स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. माणगाव संघाचा वेगवान गोलंदाज वैभव दळवी याला सामनावीर, पनवेलचा पार्थ पवार स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, इमर्जिंग प्लेअर निनाद जाधव, गंधार मानकामे, तर आयुष जुमारे याला उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून पोयनाड पोलीस स्टेशनचे पीएसआय महादेव जाधव, रामचंद्र ठाकूर, झुंझारचे सचिव किशोर तावडे, संजय सातघरे, अजय टेमकर, अंकल बहिरा, नरेंद्र शर्मा, रोहित काळे, प्रकाश देसाई, प्रतीक मोहिते, आदेश नाईक, संकेश ढोळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version