जाहिरात होर्डिंग नागरिकांसाठी धोकादायक

| महाड | वार्ताहर |

महाड नगरपालिकेने जाहिरातीसाठी दिलेल्या ठेकेदाराकडून शहरात बसवलेले होर्डिंग नागरिकांसाठी धोकादायक बनले आहेत. भर गर्दीच्या ठिकाणी बसवलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगकडे पालिका प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केले आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि शाळांच्या परिसरात होर्डिंग लावण्यात परवानगी कोणी दिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे. राज्यात होर्डिंग्ज कोसळून अनेक अपघात आजपर्यंत झाले आहेत, मात्र तात्पुरती कारवाई करून पुन्हा मोकाट सोडले जात आहे.

महाड शहरात होर्डिंग नियमावलीची पायमल्ली करत एकाच ठेकेदाराला पुन्हा पुन्हा संधी दिली जात आहे. मात्र, या ठेकेदार कंपनीकडून शहरातील गजबजलेल्या ठिकाणी आणि शालेय परिसरात होर्डिंग लावण्यात आले आहेत. यापूर्वी देण्यात आलेल्या महाड नगरपालिकेने शहरामध्ये सूचित केलेल्या जागेत होर्डिंग बसवण्याकरता प्रसिद्ध केलेल्या निविदेतून महाड नगर पालिका वर्षाला दहा लाख रुपये मिळत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून घेतले आहेत. मात्र महाड शहरात अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यात पालिकेला अद्याप यश आलेले नाही. शहरात विविध ठिकाणी उभे केलेले होर्डिंग धोकादायक असून देखील पालिकेचे दुर्लक्ष आहे.

महाडमध्ये शिवाजी चौक परिसरात कायम नागरिकांची वर्दळ असते. छ.शिवाजी चौक हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी रिक्षा, बस, अन्य प्रवासी वाहतुकीचे थांबे आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगार देखील या ठिकाणी कामावर जाण्यासाठी गर्दी करून असतात. सद्या शाळा बंद असल्या तरी या ठिकाणी विद्यार्थीवर्गाची देखील ये-जा सुरु असते. महाड नगरपालिकेचे गाळेदेखील या ठिकाणी असल्याने ग्राहकांची कायम गर्दी असते. अशा ठिकाणी रस्त्यालगत भले मोठे होर्डिंग काही वर्षापूर्वी बसवण्यात आले आहेत. याठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून काम केले असून पालिका प्रशासनाच्या हि बाब निदर्शनास येवू नये हि आश्‍चर्याची बाब आहे.

संबंधित ठेकेदाराने महाड शहरातील शाळा नंबर पाचसमोर शाळेच्या आवारातच अशा प्रकारचे होर्डिंग लावले आहे. शाळा सूरू झाल्यानंतर शाळेच्या लहान मुलांच्या जीवाशी धोकादायक असलेले हे होर्डिंग तत्काळ हटवण्याची गरज बनली आहे. अशाच प्रकारे शहरात विविध ठिकाणी होर्डिंग बसवण्यात आले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी होर्डिंग पडून, कोसळून अपघात झालेले आहेत. त्यानंतर शासनाने एक नियमावली तयार केली आहे. मात्र महाड शहरात या होर्डिंगबाबत नियमावली पायदळी तुडवली गेली आहे. महाड नगरपालिकेने किती आणि कोणत्या जागा नेमून देण्यात आल्या आहेत, याबाबत पालिका कर्मचारी बोलण्याचे टाळत आहेत. भर चौकात अशा प्रकारचे होर्डिंग उभे केलेले पालिका अधिकारी आणि नगरसेवकांना दिसू नयेत हि आश्‍चर्याची बाब असल्याचे स्थानिक विक्रेते सांगत आहेत.

Exit mobile version