छोट्या व्यवसायावर हातोडा; धनदांडग्यांना सरंक्षण
। महाड । प्रतिनिधी ।
महाड नगर पालिकेच्या बांधकाम विभागाने गुरुवारी शहरामध्ये असलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली असून रस्त्यावर उभ्या केलेल्या अनधिकृत टपर्या आणि दुकानासमोरील शेडवर जेसीबीचालवून कारवाई केली आहे. ही कारवाई शहरामध्ये दोन दिवस चालणार असल्याची माहिती महाड नगर पालिकेचे अभियंता सुहास कांबळे यांनी दिली.
शहरात विविध भागात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असून गेली अनेक वर्ष तुटपुंज्या कारवाया केल्या जात होत्या. शहरातील मुख्य रस्त्यांवर पदपथावर लागणार्या हातगाड्या, टपर्या यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने शहरात विविध भागात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत याबाबत अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करत जे.सी.बी. लावून दुकानासमोरील शेड, टपर्या हटवण्यात आल्या. या कारवाईबाबत एकीकडे समाधान व्यक्त केले जात असून दुसरीकडे मात्र धनदांडग्या लोकांनी केलेल्या अनधिकृत कामांना मात्र एकप्रकारे अभय देण्याचे काम केले जात आहे. काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला.
शहरामधील सुमारे 50 ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई केली जात असून दोन दिवस कारवाई मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या मोहिममध्ये नगर पालिका मुख्य अधिकारी महादेव रोडगे यांच्या समवेत नगर अभियंता सुहास कांबळे नगर पालिकेचे 20 कर्मचारी 10 पोलीस कर्मचारी सहभागी होते. याकरिता 2 डंपर, 2 जे सी बी, आणि 2 ट्रॅक्टर वापरण्यात आले.