निधीअभावी ज्ञानमंदिरांची परवड

विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यामधील 482 शाळांची दुरुस्ती निधीअभावी रखडली आहे. शासनाकडून निधी वेळेवर मिळत नसल्याचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना बसत आहे. त्याचा परिणाम शिक्षणावर होत असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली आहे. या शाळेतील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यामध्ये तीन जून 2020 मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाबरोबरच 2021 मध्ये तौक्ते वादळाचा फटका बसला. जिल्ह्यातील शाळांचे नुकसान प्रचंड झाले. जिल्ह्यातील दोन हजार 566 शाळांपैकी 482 शाळांची अवस्था सध्या बिकट आहे. या शाळांमध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी शाळेची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. नादुरुस्त शाळांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना फार मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यात शिक्षकांनाही शिकवताना समस्या जाणवत आहे. जिल्हयातील शाळांमधील लादया जून्या झाल्या असून त्याठिकाणी बसण्या योग्य नाही. अनेक शाळांची इमारत जुनी आहे. काही शाळांच्या नावाचे फलक तुटलेले आहे. शाळेच्या खिडक्या तुटलेल्या, पत्र्यांना गळती लागत आहे. अनेक भिंतीना तडे पडले आहेत. 800 वर्ग खोल्या खराब झाल्या आहेत. जीर्ण झालेल्या मोडकळीस आलेल्या 500 खोल्या आहेत. काही शाळांमधील स्लॅब कोसळत आहे. त्यात काही शाळांमधील रंग उडाल्याने इमारती जुन्या दिसू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांची देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे व समग्र शिक्षा अभियान विभागाकडे सुमारे 96 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहेत. त्यात शाळांच्या नवीन खोल्यांसाठी 76 कोटी रुपये व अन्य दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनकडे वीस कोटी रुपयांची मागणी केली आहे.

डीपीडीसी बैठकीकडे लक्ष
जिल्ह्यातील 482 शाळांची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र शासनाकडून निधी न मिळाल्याने शाळांची दुरुस्ती रखडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रविवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे या बैठकीत शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होईल का याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्यासाठी समग्र शिक्षा अभियान व जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे. शाळेत नव्या वर्ग खोल्यांची गरज असून काही शाळांची रंगरंगोटी व अनेक दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. निधी आल्यावर शाळांची दुरुस्ती केली जाईल.

पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version