गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सवाचे वेध

| पेण | प्रतिनिधी |

साखरचौथ गणपतींच्या विसर्जनानंतर खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची सांगता होते. दि.3 रोजी झालेल्या साखरचौथ गणपतींच्या विसर्जनानंतर आता नवरात्र उत्सवाची तयारी पेण शहरात मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. यावर्षी रविवार, दि.15 रोजी घटस्थापना व दि.24 रोजी दसरा आहे.

सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते नवदुर्गा प्रतिष्ठापना करीत असल्याने मूर्तींची ऑर्डर देण्यापासून ते कार्यक्रमाचे नियोजन करण्यापर्यंतची तयारी लगबगीने सुरू आहे. या नवरात्र उत्सवासाठी देवीच्या मूर्ती बनविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. दुर्गामाता, महिषासूरमर्दिनी, अंबा माता, भारत माता, कलकत्ता देवी, कालिका माता व इतर देवींच्या एक फुटापासून आठ ते नऊ फूट उंचीच्या देवींच्या मूर्ती तयार झाल्या असून, मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी ठिकाणी कच्च्या व पक्क्या मूर्ती रवानाही झाल्या आहेत.

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे तरुणाईसाठी उत्साहाचे दिवस असतात. पेण शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक मंडळांकडून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रासगरबा, दांडिया अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. काही मंडळांमार्फत देवीच्या प्रतिमांचे पूजन होते, तर काही मंडळे ही मातीच्या मूर्तीची स्थापना करतात. या उत्साहात आबालवृद्धांचा मोठा सहभाग असतो. काही उत्साही मंडळी तर आतापासून नवरात्रीसाठी नवनवीन ड्रेस, गरब्यासाठी विशेष वेगळी वेशभूषा, दांडिया इत्यादींची खरेदी करु लागले आहेत. तसेच काही तरुण मंडळींनी तर चक्क गरब्याच्यावेळी चांगले नृत्य करता यावे यासाठी क्लासदेखील लावले आहेत.

Exit mobile version