| नवीन पनवेल | वार्ताहर |
लग्न करून घरी आलेल्या महिलेने घरातील दागिने आणि पैसे घेऊन निघून गेल्या प्रकरणी तिच्या विरोधात आणि तिची आई व काका यांच्या विरोधात सोमवारी (दि.7) ऑक्टोबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहू तायडे उर्फ नागेश हे त्यांच्या बहिणीसोबत करंजाडे येथे राहतात. (दि.3) ऑगस्ट रोजी त्यांचे प्रणाली हिरोळे यांच्यासोबत लग्न झाले. यावेळी पत्नीला त्यांनी दागिने घालण्यास दिले. लग्न झाल्यानंतर ते व त्यांची पत्नी प्रणाली हे बहिणीच्या घरी करंजाडे येथे राहण्यास आले. (दि.17) ऑगस्ट रोजी लहू कामावर गेले असताना बहिणीने मोबाईलवर फोन करून प्रणाली हिने घरातील 21 हजार रुपये आणि अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन कुठेतरी निघून गेली असल्याचे सांगितले. त्यामुळे ती हरवली असल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी प्रणालीचा शोध घेतला असता ती आईच्या घरी गेले असल्याचे समजले. तिचे आई भारती यांना फोन करून प्रणाली घरी परत कधी येणार असे विचारले असता प्रणाली हिला नांदावयाचे नसल्याचे सांगितले. काही दिवसांनी प्रणाली बाबत आजूबाजूच्या परिसरात व गावात चौकशी केली असता प्रणालीचे अन्य एका व्यक्ती सोबत लग्न झाले होते आणि त्यांचा घटस्फोट झाल्याचे समजले. ही गोष्ट प्रणालीच्या आईने त्यांना सांगितली नव्हती. यावेळी तिच्या पहिल्या पतीकडे चौकशी केली असता प्रणालीने त्यांच्या घरातील दागिने व पैसे घेऊन ती घरातून अशी निघून गेली होती व अशाप्रकारे प्रणाली फसवणूक करत असल्याचे सांगितले आणि त्यात तिची आई भारती हिरोळे आणि काका गौतम हिरवळे हे सहकार्य करतात असे समजले. त्यामुळे प्रणाली हिरोळे, आई भारती हिरोळे आणि काका गौतम हिरोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्न करून घरी आली आणि घरातील दागिने आणि पैसे घेऊन गेली
