आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले या आ.भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्याचे अपक्ष आ.बच्चू कडू यांनीही समर्थन केले आहे. शिंदे गटाचे आ. गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून केलेल्या गौप्यस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे.
‘आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मंत्री झाले आणि काही आमदारांसाठी मंत्रीपदाचा त्याग केला’ भरत गोगावलेंच्या या विधाबाबद्दल बच्चू कडूंना प्रसारमाध्यमांनी विचारलं. त्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांबरोबर त्याची काय चर्चा झाली, याची मला माहिती नाही. पण, प्रत्येकाने त्याग केला आहे. त्यातूनच सरकार स्थापन झालं आहे.
शिंदेंबाबत प्रत्येकाच्या भावना घट्ट होत्या. काम करणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भरत गोगावले यांनीही त्याग केला आहे. त्यात काही नवल नाही. ‘मी थांबतो, दुसऱ्यांना मंत्री करा’ अशी भूमिका घेतल्याने भरत गोगावले मागे राहिले, असेही बच्चू कडू यांनी सांगितलं. अलिबागमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोगावलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याप्रमाणे आमच्यासारख्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, असे सांगितलं होतं..