भरमसाठ विद्युत देयकाविरोधात उपोषण

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील लोहारे येथील विद्युत ग्राहक रघुनाथ पांडूरंग वाडकर यांना भरमसाठ विद्युत देयक आल्याने त्यांनी शुक्रवार (दि.24) पासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या पोलादपूर कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा एका लेखी नोटीशीने दिला आहे. या नोटीशीच्या प्रती रघुनाथ वाडकर यांनी पोलादपूर तहसिलदार, पोलादपूर पोलीस ठाणे, रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी गोरेगाव यांना पाठविल्या आहेत.

लोहारे येथील रघुनाथ वाडकर यांच्या नावावर असलेल्या विद्युत मीटरला दि. 1-10-2021 रोजी महावितरणचे कर्मचारी आणि वायरमन यांनी पंचनामा करून 80 हजार रूपये विद्युत बिल आकारले आणि त्यावरील व्याजापोटी एकूण 99 हजार रक्कम जमा करण्यास सांगितल्याने 65 वर्षे वयाचे रघुनाथ वाडकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बदली होत नसलेले महावितरणचे अभियंता सुद यांनी रघुनाथ वाडकर यांना या बिलाची रक्कम आधी जमा करण्यास सांगितल्याने झालेल्या प्रचंड मनस्तापापोटी वाडकर यांनी हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही परिस्थितीत योग्य बिलाची आकारणी झाल्याखेरिज आपण उपोषणाचा निर्णय रहित करणार नसल्याचे वाडकर यांनी निक्षून सांगितले आहे.

Exit mobile version