प्रतीक्षा संपली, माणगावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 93 लाख रुपये मंजूर
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच शहरीकरण व नागरिकीकरण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर विविध स्वरुपाची गुन्हेगारीही वाढत आहे. मुंबई-गोवा महामार्ग तसेच दिघी-पुणे राज्यमार्ग हे दोनही महत्त्वाचे मार्ग माणगाव शहरातून गेले आहेत तसेच लोहमार्ग व जवळच असणारा खाडी, सागरी मार्ग असल्याने गुन्हेगारीला मोठा वाव आहे. माणगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाल्याने नागरिकांच्या विकासाच्या आशा आकांक्षा रुंदावल्या आहेत. सतत होणार्या घरफोड्यांच्या घटनांनी पोलिसांसह नागरिकही बुचकळ्यात पडले आहेत. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने या गुन्हेगारांचा तत्काळ तपास लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्यांची काळाची गरज होती. गेली अनेक दिवस नागरिक सीसीटीव्हीच्या प्रतीक्षेत होते. लवकरच माणगावात कॅमरे बसविले जाणार असून पोलिसांची गुन्हेगारावर करडी नजर राहणार आहे.
माणगाव नगरपंचायत स्थापन होवून 10 वर्ष लोटली. शहरीकरणा बरोबरच नागरिकीकरण ही वाढू लागल्याने विविध गुन्हेगारी डोके वर काढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्याही सुरक्षिततेचा मुद्दा हळूहळू पुढे येवू लागला आहे. नागरिकांची सुरक्षेसाठी पोलीस सदैव रस्त्यावर असतात. तरीही गुन्हेगार तितकेच चपळ व हुशार झाले आहेत. माणगाव नगरपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी माणगाव शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधून 93 लाख रुपये सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यासाठी मंजूर झाले असून येत्या 8 दिवसात हे सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत. माणगाव शहरातील महत्त्वाच्या 47 ठिकाणी हे तब्बल 122 कॅमरे बसविले जाणार असून गुन्हेगारीवर आता वॉच राहणार आहे.
माणगावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची परवानगी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली असून हे सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाच्या असणार्या मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत ठिकठिकाणी गर्दीच्या ठिकाणी, मोर्बा रोड, निजामपूर रोड, बस स्थानकासमोर, कचेरी रोड तसेच शाळा, विद्यालय, महाविद्यालय, नगरपंचायतीच्या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्या ठिकाणी हे बसविले जाणार आहेत. त्यामुळे गुन्हेगारासह सार्वजनिक ठिकाणी नगरपंचायतीच्या जागेत तसेच निजामपूर रोड, मोर्बा रोड, महामार्गलगत, कचेरी रोड, लगत कचरा टाकणार्यावर सीसीटीव्ही कॅमेर्याची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे माणगाव व परिसरात गुन्हेगारीला आळा बसणार असून एखादी गुन्ह्याची घटना घडल्यास पोलिसांना तपास करण्यात मदत होणार आहे. त्यामुळे या तिसर्या डोळ्याची गुन्हेगावर करडी नजर राहणार आहे.