रस्त्यावर कंटेनरमुळे प्रवासी, नागरिक त्रस्त
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रानंतर आता निजामपूर भागात असणार्या कंपन्यामुळे अवजड वाहतूक वाढली आहे. मुळातच माणगाव- निजामपूर-पुणे जाणारा रायगड हद्दीपर्यंत रस्ता अरुंद आहे. या मार्गावर लहान मोठ्या वाहनांची गर्दीत वाढ झाली आहे. या मार्गावर कंटेनरसारख्या लांब व अवजड असणार्या वाहनांसाठी रात्रीची वेळ ठरवून दिली आहे. मात्र अनेक वेळा लांब असणारे अवजड कंटेनर दिघी बंदराकडून माणगाव-निजामपूर रस्त्याने कंपनीकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे अपघातात वाढ होत असून या मार्गाने जाणारा प्रवासी नागरिक असुरक्षित प्रवास करीत असून दिवसेंदिवस पुणे मार्गावर अवजड वाहतुकीचे अवघड दुखणे हे कायम राहिले आहे.
माणगाव विळे ताम्हिणी घाट मार्गे पुणे हा मार्ग 25 वर्षांपूर्वी सुरु झाला. हा रस्ता मुळातच अरुंद आहे. तसेच अनेक ठिकाणी चढउतार असणारी अवघड वळणे असल्याने या मार्गावर एकच मोठे वाहन जाते. रस्त्यांच्या दोनही बाजूला साईडपट्ट्या भरल्या नसल्याने येणार्या जाणार्या दोनही वाहनांना वाहन सावकाश चालवावी लागते. या मार्गावरून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकण दर्शनासाठी येतात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक वाढली आहे. पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना कोकण दर्शनासाठी ताम्हिणी घाट मार्ग कमी अंतराचा असल्यामुळे या मार्गावरून प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात.
निजामपूर परिसरात असणार्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात दिघी बंदरातून येणारे जड स्टीलची कॉईल लांब असणार्या कंटेनरमधून वाहतूक केली जाते. या अवजड वाहतुकीमुळे अरुंद रस्त्यावर तसेच वळण व चढउतार असणार्या रस्त्यावर या वाहनावर वाहनचालकाचा ताबा राहत नाही. त्यामुळे कंटेनरचे अपघात सतत होत आहेत. एखादा कंटेनर रस्त्यात बंद पडला अथवा पलटी झाल्यास या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प होते. त्यामुळे या कंटेनरवर शासनाने बंदी आणावी अशी मागणी होत आहे. या मार्गावरून पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांसह निजामपूर-विळे भागातील अनेक गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी माणगाव येथे येतात तर महिला, वृध्द नागरिकांना उपचारासाठी माणगाव येथे यावे लागते. तसेच माणगाव येथील बाजारपेठ मोठी असल्याने खरेदीसाठी यावे लागते. या मार्गावर अवघड वळणे असल्याने अपघातात वाढ होत आहे. शासनांनी या रस्त्याच्या साईडपट्ट्या त्वरित भराव्यात व रस्त्यालगत वाढलेली झाडे – तोडावीत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.