। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील उसर मल्याण परिसरात गेलचा पॉलिमर प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठीच्या भूसंपादन मोजणीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर करीत रोखले. आमचा प्रकल्पाला विरोध नाही मात्र आम्हाला जमिनीचा योग्य मोबदला आणि प्रकल्पात नोकरी द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मोजणी रोखण्यासाठी शेकडो शेतकरी जमले होते. दुसरीकडे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तिथं प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरली. प्रशासन मोजणीच्या भूमिकेवर ठाम राहिले. मोजणीला सुरूवात होताच स्थानिकांनी त्याला विरोध केला. मात्र प्रशासनाने बळाचा वापर करीत त्यांना अडवले आणि दूर केले. त्यानंतर आंदोलकांच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.